४८ दिवसांनी राज्यात शून्य कोरोना बळी

0
15

>> राज्याला मोठा दिलासा; सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ५७९ वर

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात झाल्यापासून राज्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरू होते. जानेवारीपासून दरदिवशी किमान एका कोरोना बळीची नोंद होत होती; मात्र काल हा प्रकार खंडित झाला. राज्यात तब्बल ४८ दिवसांनंतर शून्य कोरोना बळीची नोंद झाली. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात चोवीस तासांत नवीन ४९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात साधारण ४८ दिवसांनी शून्य कोरोना बळीची नोंद झाली आहे. गेल्या ३ जानेवारीला एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर गेले सलग ४८ दिवस कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र होते. २८ जानेवारीला कोरानाचे मृत्यूतांडव पाहायला मिळाले होते. या दिवशी तब्बल २० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

कोरोना रुग्ण कमी संख्येने सापडत असले तरी कमी-अधिक संख्येने कोरोना बळी जात होते. त्यानंतर हे सत्र काल थांबले. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७९२ एवढी झाली आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्यात नवीन बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून, ११७९ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील ४९ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले.

राज्यात मागील चोवीस तासांत आणखी ४० जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२१ टक्के एवढे आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.१५ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५७९ एवढी झाली आहे.

कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेमध्ये दाबोळी आंतरराष्ट्रीय विमातळावरील विमानांच्या घटलेल्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. दाबोळी विमानतळावर २० फेब्रुवारी रोजी ८३ विमानांचे आगमन झाले आणि ८३ विमानांनी उड्डाण केले. या विमानातून २६ हजार ७९२ प्रवाशांनी प्रवास केला. अलीकडच्या काळातील ही सर्वाधिक संख्या आहे.