योगसाधना – ५३९
योगमार्ग – राजयोग
अंतरंग योग – १२४
- डॉ. सीताकांत घाणेकर
धरणीमातेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पवित्र असायला हवा. धरतीकडे बघताना फक्त उपयुक्तता ही दृष्टी न ठेवता उपासनेची दृष्टी असावी. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही प्रार्थना म्हणण्याचा आग्रह ठेवला,
भारतीय तत्त्ववेत्ते खरेच फार थोर आहेत. त्यांची बुद्धी अतिशय विशाल व तीव्र आहे. विविध रूपाने, पद्धतीने आवश्यक संस्कार रोजच्या जीवनातील घटनांबरोबरच ते छान पद्धतीने देताहेत. या संस्कारांमधील प्रमुख संस्कार – कृतज्ञता. म्हणूनच शास्त्रकार म्हणतात – मनुष्य म्हणजेच कृतज्ञता.
आजचा मानव स्वार्थी, स्वकेंद्रित झाला आहे पण दुःखाची बाब म्हणजे झपाट्याने तो कृतज्ञता विसरतो आहे. तो जास्तीत जास्त कृतघ्न होतो आहे.
आपण अभ्यास करत आहोत तो भूमीबद्दल. परत एकदा सकाळी उठल्याबरोबर म्हणायचा श्लोक आठवू या…
‘‘समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले |
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
धरणीमातेला विष्णुपत्नी म्हटले आहे. म्हणजे विष्णू हा पालनकर्ता पिता व तशीच पालनकर्ती माता. विश्वांत सर्व जिवंत सृष्टीला – सर्व प्रकारचे प्राणी, पशू, पक्षी, जीव, जंतू, कृमी, कीटक, वृक्ष, वनस्पती, मानव… यांना जीवन जगण्यासाठी जे जे लागते ते सगळे आपली माता पुरवते. यातील प्रत्येक घटक काही ना काही कृतज्ञतेपोटी विश्वाला देतो.
- वृक्ष, वनस्पती- फुले, फळे, बीज, धनधान्य, लाकूड, छाया देतात.
- पशू/प्राणी- दुधासारखे अमृत पेय देतात. गाईची विष्ठा म्हणजे शेण हे उत्कृष्ट खत आहे.
- कृमी, कीटक- गांडुळासारखा एक लहानसा नगण्य जीव जमीन नांगरतो, सुपीक करतो.
- मधमाशीसारखे लहान प्राणी पौष्टिक मध देतात.
- जनावरांची चामडी पायतणे बनवण्यासाठी वापरतात.
असे अनेक उपयोग आहेत. निसर्गाच्या श्रुंखलेत प्रत्येकाचा सहभाग आहे.
पण इथे नोंद करण्यासारखा मुद्दा म्हणजे सर्वांचे भोग शेवटी धरतीमाताच पुरवते. मात्र तिच्याकडून भोग मिळतात म्हणून ती भोग्य नाही, पूज्यच आहे. त्यामुळे धरणीमातेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पवित्र असायला हवा. धरतीकडे बघताना फक्त उपयुक्तता ही दृष्टी न ठेवता उपासनेची दृष्टी असावी. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही प्रार्थना म्हणण्याचा आग्रह ठेवला, फक्त कर्मकांडात्मक नव्हे तर भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ समजून. दुर्भाग्य या मातेचे की मानव आज फक्त भोगदृष्टीनेच तिच्याकडे बघतो आहे.
सबंध श्लोकात प्रत्येक शब्दात भाव आहेच. पण शेवटच्या चार शब्दांत सुज्ञ मानवाने काय करायला हवे याचे ज्ञान आहे- ‘‘पादस्पर्शं क्षमस्व मे… म्हणून नमस्तुभ्यं.’’ पादस्पर्श होतो म्हणून क्षमा मागायची. खरे म्हणजे पाय लागण्याची घटना अगदी नैसर्गिक आहे. कारण नाहीतर आम्ही कोणतीच कामे करू शकणार नाही. उभे राहणे हा आमचा स्थायिभाव आहे. तशी आवश्यकता आहे.
एरवी आपण पाहतो की आपला पाय चुकून जरी कुणाला लागला तर आपण लगेच नमस्कार करतो व क्षमा मागतो. लहानपणी माझ्या मनात विचार यायचा की एरवी आपण हस्तांदोलन करतो. जेवढे जास्त प्रेम असेल तेवढा जास्त वेळ करतो. भावपूर्ण पद्धतीने हात हातात घेतो. त्यात काही गैर नाही, तर ती प्रथा आहे- जास्त करून पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये. आपली प्रथा ‘नमस्कार’ करण्याची पण आपण ती विसरलो आणि त्यांची उचलली.
(आता कोरोनाच्या काळात नमस्काराची आपली प्रथा वैज्ञानिक दृष्टीने किती बरोबर आहे हे आपल्याला समजले आहे. सर्व विश्व ती प्रथा उचलत आहे. आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.)
उत्तर सापडत नव्हते. प्रश्न मनात येत होते- हस्तांदोलन ग्राह्य व पाय चुकूनही लागला तर पाप. आणि एक दिवस ध्यानावस्थेत असताना उत्तर सापडले.
- आपण चुकून पाय लागला तरी पाप मानतो आणि आपल्यातील कितीतरी तथाकथित महापुरुष(!) दुसर्याला लाथ अगदी सहज व हक्काने मारतात. त्यावेळी त्या व्यक्तीतील देवत्व ते विसरतात. ते आपल्याच सत्तेच्या गुर्मीत असतात. म्हणजे अशा व्यक्ती महापापी झाल्या. या अशा मिथ्याभिमानी, अहंकारी लोकांना हे तत्त्वज्ञान समजले तर कदाचित लाथ मारणे बंद होईल, अशी आशा करूया. त्यांच्यासाठी सद्बुद्धी मागू या.
पृथ्वी आपल्या पोटात – पाणी, खनिजे, तेल… अशा अनेक आवश्यक वस्तू साठवून ठेवते. गरज असेल त्याप्रमाणे वापरण्यासाठी… ज्या सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे पाणी- जल होय. - जल बिना जीवन नही. ज्यांना पाणी सहज मिळते त्यांना त्याचे महत्त्व वाटत नाही. म्हणून अनेकवेळा आपण पाणी वाया घालवतो- जसे तोंड धुताना, भांडी साफ करताना, आंघोळ करताना, गाड्या धुतांना, जमीन धुताना, झाडांना पाणी घालताना इत्यादी.
आपण पाणी वापरण्याचे बघतो- जमिनीखालचे तर विविध प्रकारे – विहीर खणून, गरज पडल्यास पंप लावून पाणी खेचून काढतो. विचार न करता हा अत्याचार चालूच आहे. त्यामुळे धरतीखालील पाण्याचा थर दिवसेंदिवस खाली जातो आहे. त्यामुळे अनेक गावांत पाण्याची टंचाई भासते.
खरे म्हणजे विचारवंत मानवाने जेवढे पाणी खेचून घेतो तेवढे धरणीमातेला परत करायला हवे. आनंदाची गोष्ट आहे की विविध वैज्ञानिक प्रक्रिया वापरून विश्वातील अनेक संस्था पाणी जिरवण्याच्या प्रक्रिया नियमित करतात. अशा संस्थांचा दृष्टिकोन भावपूर्ण आहे.
इस्राईलसारखा देश तर या संदर्भात अग्रेसर आहे. जिथे आम्हाला अनेक ठिकाणी १०० ते १२० इंच पाऊस पडतो तरी आम्हाला पाण्याची टंचाई भासते. कितीतरी गावांत पाणीच नाही अथवा पाऊससुद्धा पडत नाही. इस्राईलला पावसापासून दीड ते दोन इंच पाणी मिळते. ते पाणी मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. प्रत्येक ठिकाणी सावधगिरीने पाण्याचा वापर ते करतात. शेतीसाठी त्यांनी ‘ठिबकसिंचन’ पद्धती अवलंबिली आहे. इथे प्रत्येक प्रकारच्या झाडाची आवश्यकता किती प्रमाणात आहे याचे संशोधन करून त्याप्रमाणे पंपद्वारा तेवढे पाणी प्रत्येक रोपाला दिले जाते.
इस्राईलच्या पाण्याच्या अशा व्यवस्थेमुळे, असे म्हणतात की हे राष्ट्र अनेक देशांना भाज्या- फळे निर्यात करतात. त्यांची संस्कृती व राष्ट्रप्रेम तर प्रसिद्धच आहे. म्हणून एवढासा छोटा देश अनेक वर्षे आजूबाजूच्या अरब राष्ट्रांशी यशस्वी लढा देतो. त्यांची आणखी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे त्यांची राष्ट्रभाषा हिब्रू आहे, इंग्रजी नव्हे! आपण जसे संस्कृत भाषेला देवाची भाषा मानतो तसे इस्रायली लोक हिब्रूला देवाची भाषा मानतात. १९४७ वर्षी हे राष्ट्र जगभर पसरलेल्या ज्यू लोकांनी पुनर्स्थापित केले आणि त्यानंतर आपली राष्ट्रभाषा सर्वांना शिकवली. धन्य ते राष्ट्र ज्यांनी अशा सुपुत्रांना जन्म दिला.
शास्त्रकार म्हणतात की गाईच्या आचळातील दूध वासरू पिते तसाच गोचीडसुद्धा पितो. पण वासराला मातृवात्सल्याची जाणीव आहे. त्यामुळे ते मातेला त्रास न देता आवश्यक तेवढेच दूध पिते आणि गोचीड? दुधाबरोबर गाईचे रक्तसुद्धा पिते.
मानवाने विचार करायला हवा- की मी वासरू व्हायचे की गोचीड?
भारतीयांनी विचार करायला हवा …
- आम्ही ज्यूसारखे राष्ट्रप्रेमी, संस्कृतीप्रेमी होणार?
- आम्ही संस्कृत भाषेचे पुनरुत्थान करणार की इंग्रजीचे गुलाम होणार?
श्लोक व्यवस्थित समजून उमजून, अभ्यास – चिंतन करून त्याप्रमाणे आचरण केले तर आपला दृष्टिकोन नक्की बदलेल.
मला ज्ञात आहे की आपले सर्व योगसाधक असेच ध्येय बाळगून त्याप्रमाणे धारणासुद्धा करतात. भगवंत सर्वांना सद्बुद्धी व यश देईलच.