श्रीमंत अन् गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार वाढले

0
14

>> एडीआरचे विश्‍लेषण; ५३ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद; बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमी

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये श्रीमंत आणि गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या यंदा वाढली आहे, असे विश्‍लेषण नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने केले आहे. एडीआरतर्फे काल पणजीत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांविषयीचे विश्‍लेषण व आकडेवारी सादर करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला गोवा समन्वयक भास्कर असोल्डेकर आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचे मांगिरीश रायकर यांची उपस्थिती होती.

एडीआरने ३०१ उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे विश्लेषण केले आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांशी शैक्षणिक पात्रता कमी आहे, तर दुसर्‍या बाजूला कोट्यवधी संपत्ती असलेल्या आणि गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. पदवीधर आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची टक्केवारी ४२ टक्के एवढी आहे.

निवडणूक रिंगणात उतरलेल्या ७७ उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी खटले नोंद असून, हे प्रमाण २६ टक्के एवढे आहे. गंभीर गुन्हेगारी खटले नोंद असलेल्या उमेदवारांची संख्या ५३ एवढी असून, हे प्रमाण १८ टक्के एवढे आहे.

१२ मतदारसंघांमध्ये ३ किंवा त्याहून अधिक उमेदवारांविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. १२ उमेदवारांविरुद्ध महिलांवरील अत्याचार प्रकरणी गुन्हे नोंद आहेत, तर एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. ८ उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे.
A१० कोटी रुपये आणि त्याहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या २०२२ मध्ये २० पर्यंत वाढली आहे.

निवडणुकीतील कोट्यधीश उमेदवारांची संख्या १८७ (६२ टक्के) एवढी आहे. मागील १५ वर्षांपासून कोट्यधीश उमेदवारांच्या संख्येत वाढ होत आहे. ५ कोटी व त्याहून अधिक मालमत्ता असलेले ९३ उमेदवार आहेत. १० लाख ते ५० लाखांपर्यंत मालमत्ता असलेले ६० उमेदवार, तर १० लाखांपेक्षा कमी मालमत्ता असलेले ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मालमत्तेच्या संदर्भात काही उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील विसंगती दर्शवते, असा दावा एडीआरने केला आहे.

निवडणूक रिंगणात उतरलेल्या तीन उमेदवारांची मालमत्ता डोळे विस्फारणारी आहे. मायकल लोबो आणि डिलायला लोबो यांची संपत्ती ९२.९१ कोटी रुपये एवढी आहे, तर अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे ५९.६३ कोटींची मालमत्ता आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारीवर ११६ जण, तर प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारीवार १०४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.