>> प्रियंका गांधींचे टीकास्त्र; उत्तर व दक्षिण गोव्यात प्रचारसभांचा धडाका
कॉंग्रेसच्या प्रचारासाठी गोव्यात आलेल्या पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल राज्यात प्रचाराचा धडाका लावला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या गैरकारभारावर निशाणा साधला. सत्ताधारी भाजपला राज्यातील लोकांना रोजगार देण्यात, गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात आणि कोविड काळात रुग्णांना चांगली सेवा पुरवण्यात पूर्णपणे अपयश आल्याची टीका त्यांनी केली. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर गोमंतकीयांना रोजगार मिळावा, यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली जाणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याशिवाय गरिबांना दरमहा ६ हजार रुपये देण्याच्या घोषणेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
प्रियंका गांधींनी काल दक्षिण गोव्यातील बाणावली, नुवे, नावेली आणि उत्तर गोव्यातील सांताक्रूझ, सांत आंद्रे, कुंभारजुवे व पणजी मतदारसंघांत सभा घेतल्या. तसेच पणजीत घरोघरी प्रचार सुद्धा केला.
भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, एलजीपी सिलिंडर आदींचे दर प्रचंड वाढवलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण बनले आहे. खाद्यतेल, भाज्या यांच्या किमतीही गगनाला भिडलेल्या आहेत. परिणामी सामान्य लोकांना या महागाईची मोठी झळ बसली आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. भाजपची राजवट गेल्याशिवाय या वाढत्या महागाईतून सुटका नाही. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमच्या सगळ्या उमेदवारांनी गोव्याच्या कल्याणासाठी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली आहे. कॉंग्रेस पक्ष गोव्याला स्थिर व स्वच्छ प्रशासन देण्यास वचनबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
गोव्याचा निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज असून, ते काम कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर करणार आहे. याबरोबरच गोव्याची संस्कृती व अस्मिता याचे जतन करण्याचे कामही करणार आहोत, असेही त्या पुढे म्हणाल्या. गोव्यातील मतदारांना मोठमोठी आश्वासने देणार्या आम आदमी पार्टीला दिल्लीत चांगले प्रशासन देण्यास अपयश आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
प्रियंका गांधींचा पणजीत घरोघरी प्रचार
उत्तर व दक्षिण गोव्यातील विविध ठिकाणी सभा घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी काल मळा-पणजी येथे घरोघरी केला. यावेळी त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. पणजीतील कॉंग्रेसचे उमेदवार एल्विस गोम्स यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला.