पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी म्हापशात सभा

0
19

गोवा विधानसभा निवडणुकीला आता केवळ सहा दिवस शिल्लक राहिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी रोजी गोव्यात आगमन होणार असून, म्हापसा मतदारसंघात बोडगेश्‍वर मंदिरासमोर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला पक्षाचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सत्ताधारी भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे काही दिग्गज नेते व केंद्रीय मंत्री पुढील काही दिवसांत गोव्यात येणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.

नितीन गडकरींच्या आज तीन सभा
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंगळवार दि. ८ रोजी उत्तर गोव्यात तीन जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा संध्याकाळी ५ वाजता पेडण्यात होणार असून, ती पेडणे बसस्थानकावर संपन्न होणार आहे. दुसरी सभा थिवीत होणार असून, ती शिरसई फुटबॉल मैदानावर संध्याकाळी ६ वा. होणार आहे, तर तिसरी सभा शिवोलीत होणार असून, ती संध्याकाळी ७ वाजता गणपती मंदिरासमोर होणार आहे.

जे. पी. नड्डा यांच्या
दक्षिणेत दोन सभा

बुधवार दि. ९ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या फातोर्डा व नावेलीत सभा होणार आहेत. फातोर्ड्यात संध्याकाळी ६ वाजता सभा होईल. त्यानंतर नावेलीत सभा होणार आहे.

अमित शहा मयेत
करणार घरोघरी प्रचार

दि. ९ रोजी गृहमंत्री अमित शहा यांची उत्तर गोव्यात सभा होतील. सायंकाळी ४ ते ४.३० या दरम्यान ते मये मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करतील. त्यानंतर ५.३० वाजता डिचोली मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होईल. तद्नंतर त्यांची साखळी बाजारात संध्याकाळी ७ वाजता सभा होईल.

राजनाथ सिंग यांच्या
फोंडा, वास्कोत सभा

याच दिवशी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दोन जाहीर सभा फोंडा व वास्को येथे होणार आहेत. फोंडा येथे संध्याकाळी ५ वाजता, तर वास्को येथे ६.३० वाजता त्यांची सभा नगरपालिका इमारतीजवळ सभा होईल.

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी भाजपच्या जाहीरनाम्याचे विमोचन होणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.