राहुल गांधींचा गोवा दौरा लांबणीवर

0
21

कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचा २ फेब्रुवारीचा गोवा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, ते शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी गोवा दौर्‍यावर येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राहुल गांधी हे २ रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजर राहून त्याविषयी आपली प्रतिक्रिया मांडणार आहेत. त्यानंतर दि. ३ रोजी ते छत्तीसगढ दौर्‍यावर जाणार आहेत. तेथे हुतात्मा सॅनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात येणार असलेल्या हुतात्मा स्मारकाचे ते भूमिपूजन करणार आहेत. त्याशिवाय नवा रायपूर येथे ते गांधी सेवाग्राम आश्रमाची कोनशिलाही ते बसवणार आहेत. तसेच भूमीहीन मजुरांसाठीच्या राजीव गांधी भूमीहीन कृषी मजदूर न्याय योजनेचा देखील ते शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे त्यांचा गोवा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे अलका लांबा यांनी सांगितले.

राहुल गांधी हे आपल्या गोवा दौर्‍यावेळी पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याशिवाय ते पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवारांची भेट घेऊन त्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत, असेही लांबा यांनी सांगितले.