>> कुठ्ठाळी व वास्कोत सर्वाधिक ९ उमेदवार रिंगणात
>> दाबोळीत सर्वांत कमी ७ जण रिंगणात
मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार प्रत्येकी ९ कुठ्ठाळी व वास्को मतदारसंघात आहेत. सर्वांत कमी ७ उमेदवार दाबोळी मतदारसंघात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ३९ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामांकन अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक आयोगाने पार पाडली.
कॉंग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष, मगो, तृणमूल कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड यांच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून सर्व मतदारसंघांमध्ये रंगतदार लढती अपेक्षित आहेत. उमेदवारांनी खबरदारी म्हणून एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते. काही डमी अर्जही भरण्यात आले होते. त्यातील काही अर्ज फेटाळण्यात आले, तर काही अर्ज ग्राह्य ठरले होते. दरम्यान, सोमवारी ग्राह्य अर्जांपैकी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३९ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता मुरगाव तालुक्यातील अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. या तालुक्यातील चारही मतदारसंघांतून एकूण ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
कुठ्ठाळीत ९ जणांमध्ये टक्कर
कुठ्ठाळी मतदारसंघातून अर्ज छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या १२ अर्जांपैकी फातिमा फुर्तादो, मेर्मियाना वाझ, शरण मेट्टी (सर्व अपक्ष) या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता नारायण नाईक (भाजप), ऑलेंसियो सीमॉईश (कॉंग्रेस), गिल्बर्ट रॉड्रिग्स (तृणमूल कॉंग्रेस), एलिना साल्ढाणा (आप), भक्ती खडपकर (शिवसेना), तिओतिनो कॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी), आंतोनिओ वाझ (अपक्ष), गिरीश पिल्ले (अपक्ष), विशाल नाईक (अपक्ष) मिळून एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
दाबोळीत ७ उमेदवार
दाबोळी मतदारसंघातून अर्ज छाननीनंतर ग्राह्य धरण्यात आलेल्या ८ जागांपैकी संजिता पेरनिम या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. आता ७ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणात आहे. माविन गुदिन्हो (भाजप), कॅ. व्हॅरियातो फर्नांडिस (कॉंग्रेस), जुझे फिलीप डिसोझा (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), महेश भंडारी (तृणमूल कॉंग्रेस), गजानन बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स), प्रेमानंद नानोस्कर (आप), तारा केरकर (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.
मुरगावात ८ जणांमध्ये लढत
मुरगाव मतदारसंघातून ग्राह्य धरण्यात आलेल्या ९ अर्जांपैकी गोपाळ कांबळी या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. आता या मतदारसंघात एकूण ८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यात मिलिंद नाईक (भाजप), जयेश शेटगावकर (तृणमूल कॉंग्रेस), संकल्प आमोणकर (कॉंग्रेस), शेख अकबर (राष्ट्रवादी कॉंग्रेस), परशुराम सोनुर्लेकर (आप), परेश तोरस्कर (रिव्होल्युनरी गोवन्स), इनायतुला खान (अपक्ष) व नीलेश नावेलकर (अपक्ष) हे उमेदवार टक्कर देतील.
वास्कोत ९ उमेदवार रिंगणात
वास्को मतदारसंघातून एकूण १० ग्राह्य अर्जांपैकी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लोरेटा श्रीधरन या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला. आता कृष्णा साळकर (भाजप), कार्लुस आल्मेदा (कॉंग्रेस), सैफुल्ला खान (तृणमूल कॉंग्रेस), आंद्रे व्हिएगस (रिव्होल्युशनरी गोवन्स), मारुती शिरगावकर (शिवसेना), सुनील लॉरेन (आप), संदीप शेट्ये (जय महाभारत पार्टी), ऍड्र्यु डिकुन्हा (अपक्ष), चंद्रशेखर वस्त (अपक्ष) मिळून ९ उमेदवार रिंगणात आहेत.
सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली. त्यानुसार प्रत्येक उमेदवारांनी आपल्या प्रचारकार्याला जोरकसपणे सुरुवात केली आहे. प्रत्येक उमेदवार घरोघरी भेट देऊन आपल्या मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा चालू ठेवली आहे.
१० नवीन चेहरे
यंदा मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतून १० नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघातून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले (अपक्ष), तियोतिनो कॉस्ता ( रिव्होल्युशनरी गोवन्स), सांकवाळचे पंच सदस्य नारायण नाईक (भाजप) आणि विशाल नाईक (अपक्ष) या चार नवख्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे. दाबोळी मतदारसंघातून कॅ. व्हॅरियातो फर्नांडिस (कॉंग्रेस) आणि गजानन (गौरीश) बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स) हे दोन नवीन चेहरे निवडणुकीत रिंगणात उतरले आहेत.
वास्को मतदारसंघातून आंद्रे व्हिएगस (रिव्होल्युशनरी गोवन्स) आणि मारुती शिरगावकर (शिवसेना) हे नवीन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुरगाव मतदारसंघात नीलेश नावेलकर (अपक्ष), जयेश शेटगावकर (तृणमूल कॉंग्रेस), इनायत खान (अपक्ष) हे तीन नवीन उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.