लढाईचा डंका

0
28

गोवा विधानसभा निवडणुकीचे विविध मतदारसंघांतील अंतिम चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक अनेक बाबतींत वेगळी आहे. पहिली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये बाहेरचे पक्ष मोठ्या हिरीरीने उतरले आहेत आणि त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांपुढे मोठे आव्हान गेल्या काळात उभे केले आहे. बंगालमधून देशदिग्विजयाची प्रतिज्ञा करीत गोव्यात उतरलेल्या तृणमूल कॉंग्रेसने मगो पक्षासारख्या स्थानिक प्रादेशिक पक्षाशी निवडणूकपूर्व युती केली आहे, तर गेल्या विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या आम आदमी पक्षाने यावेळी खूप आधीपासून कामाला सुरूवात करून कोणत्याही पक्षाच्या सोबत न जाता स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे. कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड वगळता आपल्या इतर मित्रपक्षांशी युती न करता स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतल्याने परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकाकी पडली. भरीस भर म्हणून रिव्हॉल्यूशनरी गोवन्ससारखी युवकाभिमुख संघटना राजकीय पक्ष बनून रणांगणात उतरलेली आहे. संभाजी ब्रिगेडपासून जय महाभारत पक्षापर्यंत अनेकांनी या लढाईत हात धुवून घ्यायचे प्रयत्न चालवलेले दिसत आहेत.
या निवडणुकीतील दुसरी ठळक बाब म्हणजे झालेली व्यापक पक्षांतरे. आजवर कधीही झाली नव्हती एवढ्या प्रमाणात राजकीय पक्षांतरे मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर पाहावी लागली. काहींनी तर एका पक्षातून दुसर्‍या पक्षात, तिथून तिसर्‍या पक्षात अशा उड्या घेतल्या, तर काही पक्षांतरे करून भ्रमनिरास झाल्याने म्हणा वा ज्या आर्थिक अपेक्षेपोटी उडी घेतली होती त्यांची पूर्तता न झाल्याने अल्पावधीत त्या पक्षांना रामराम ठोकला आहे.
या पक्षातून त्या पक्षात उड्या मारता मारता अनेकांनी अपक्ष म्हणूनही निवडणुकीच्या धुमाळीत उडी घेतलेली आहे. विशेषतः सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या बंडाळीचा फटका बसला आणि त्यातून सावरून घेत ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनीही फोडाफोडीत काही कसूर ठेवली नाही. त्यामुळे एकीकडे पक्षातून बाहेर पडलेली मायकल लोबो, अलिना साल्ढाणा, लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकरांसारखी मंडळी, तर दुसरीकडे पक्षात आणलेली रवी नाईक, गोविंद गावडे, रोहन खंवटे, जयेश साळगांवकर आदी माजी आमदार आणि इतर पक्षांचे फोडलेले अनेक उमेदवार अशी पाहुणे मंडळी यांनी राजकारणात चुरस निर्माण केलेली आहे.
या निवडणुकीचे तिसरे ठळक वैशिष्ट्य म्हणजे नवे चेहरे. बहुतेक राजकीय पक्षांना या निवडणुकीत अपरिहार्यपणे नवे चेहरे मैदानात उतरवावे लागले आहेत. माजी आमदार निवडून येण्याची शक्यता नसल्याने त्यांना डच्चू देऊन त्यांच्यापासून फारकत घेण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या जागी नवे चेहरे आणले गेले आहेत. २०१७ मधील सतरा जागांवरून अक्षरशः एकावर आलेल्या कॉंग्रेसने सर्वाधिक नवे चेहरे या निवडणुकीत उतरवले आहेत, कारण जे गेल्यावेळी आले होते त्यापैकी दिगंबर कामत सोडल्यास कोणीही सोबत नाही. अशा विचित्र गोष्टी या निवडणुकीत पाहायला मिळाल्या.
येत्या निवडणुकीतील अनेक लढतींवर अगदी देशपातळीवरील माध्यमांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल. सर्वांत महत्त्वाची आहे ती पणजी मतदारसंघाची निवडणूक. बलात्कारापासून गुंडगिरीपर्यंतचे विविध फौजदारी गुन्हे असलेले भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात आणि मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार उत्पल पर्रीकर यांच्यातील या सामन्याकडे देशाचे लक्ष आहे. आयात उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रणांगणात उतरवताना भाजपाने काणकोण, शिवोली आदी काही मतदारसंघांमध्ये आपल्या निष्ठावंतांचेही राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालवला आहे, कारण ही लढत भाजपासाठी आत्यंतिक प्रतिष्ठेची आहे.
निवडणुकीत मोठ्या संख्येने उतरलेली जोडपी हेही ह्या निवडणुकीचे एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. विश्‍वजित राणे व दिव्या राणे, मायकल व डिलायला लोबो, किरण आणि कविता कांदोळकर, बाबूश आणि जेनिफर मोन्सेर्रात, आदी जोडपी भावी विधानसभेत सत्यनारायण घालू पाहात आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारसभांवर घातलेली बंदी वाढवल्याने राजकीय लढतीचे रंग जरी फिके वाटत असले तरी ही लढाई अटीतटीची होणार आहे हे निश्‍चित आहे. त्यातून काय निष्पन्न होते याकडे गोव्याचे लक्ष आहे. या निवडणुकीच्या धुमाळीतून अंतिमतः गोव्याचे भले होईल अशी अपेक्षा करूया!