राज्यात जानेवारी महिन्यात १७१ जणांचा कोरोनाने मृत्यू

0
12

>> चोवीस तासांत ११ बळी, ५०० बाधित

राज्यात कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत जानेवारी महिन्यात ५८ हजार ०३४ कोरोनाबाधित आढळून आले असून १७१ कोरोनाबाधितांचा बळी गेला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ११ कोरोना बळींची नोंद झाली आहे. तसेच, नवीन ५०० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १८.८० टक्के एवढे आहे.

राज्यातील सक्रिय रूग्णसंख्या ८ हजार ७६० एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या ३७०० च्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून कोरोना बळींची एकूण संख्या ३६९३ एवढी झाली आहे. चोवीस तासांत २६५९ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत.

३३ जण इस्पितळांत
राज्यात गेल्या चोवीस तासांत ३३ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून बर्‍या झालेल्या ३३ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात १ हजार १०३ कोरोनाबाधितांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे.

चोवीस तासांत स्वॅब चाचण्यांचे प्रमाण घटले असून नवीन २६५९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. जानेवारी महिन्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ३१.४३ टक्के एवढे आहे. जानेवारीच्या सुरूवातीला कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. ७ जानेवारीनंतर बाधिताच्या संख्येत वाढ होण्यास प्रारंभ झाला. तर, जानेवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधिताच्या संख्येत घट होत आहे. गेल्या काही दिवसात नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी १३८७ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के एवढे आहे.