धोका वाढला; १५ कोरोना बळी

0
28

बळींपैकी ९ जण लसीकरणाविना; नवे ९५५ रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या १४ हजारांखाली

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट दिसून येत आहे, तर दुसर्‍या बाजूला गेल्या २४ तासांत तिसर्‍या लाटेतील सर्वाधिक कोरोना बळींची नोंद झाली. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यापूर्वी २१ जानेवारीला सर्वाधिक ९ बळींची नोंद झाली होती. गेल्या २४ तासांत नवीन ९५५ कोरोनाबाधित आढळून आले राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असून, सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार २६९ एवढी खाली आली आहे.

राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत असून, गेल्या चोवीस तासांत आणखी १५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. परिणामी कोरोना बळींची एकूण संख्या ३६४५ एवढी झाली आहे.

७१ जण इस्पितळात दाखल
गेल्या चोवीस तासांत नवीन ३४०२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ९५५ नमुने बाधित आढळून आले. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २८.०७ टक्के एवढे आहे. राज्यात चोवीस तासांत ७१ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्‍या झालेल्या ४१ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
३३९० जण कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ३३९० जण कोरोनामुक्त झाले. परिणामी सक्रिय रुग्णसंख्या १४ हजारांच्या खाली आली असून, सध्या राज्यात १३ हजार २६९ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८० टक्क्यांवर पोहोचले आहे.

बळींपैकी ४ जण
६० वर्षांखालील

ज्या रुग्णांनी आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्यांचाच तिसर्‍या लाटेत कोरोनाने मृत्यू होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. काल ज्या १५ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी ९ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तर ४ बळी गेलेले रुग्ण ६० वर्षांखालील आहेत. यापैकी १३ जणांचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला. एकाचा दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात, तर एकाचा इस्पितळाबाहेर मृत्यू झाला.

तिसर्‍या लाटेत लस न घेणार्‍या ४९ जणांचा मृत्यू

लसीकरण प्रमुख डॉ. बोरकर यांची माहिती

सध्याच्या घडीला कोविड प्रतिबंधक लस न घेणार्‍या रुग्णांचाच मृत्यू होत असून, कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत आतापर्यंत (२३ जानेवारी) लस न घेतल्याने ४९ जणांचा बळी गेला आहे. लस न घेतलेल्या कोरोना बळींचे प्रमाण ५३ टक्के एवढे आहे, अशी माहिती राज्य लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

कोविड महामारीच्या पहिल्या लाटेवेळी कोणतीही लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे राज्यात कोविडच्या पहिल्या लाटेत ७९५ जणांचा बळी गेला. दुसर्‍या लाटेत कोविड लस उपलब्ध होती; मात्र लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नव्हते. या दुसर्‍या लाटेत एकूण २७२४ जणांचा बळी गेला. त्यात लस न घेतलेल्या २५०० जणांचा समावेश होता. बळी गेलेल्या १४७ जणांनी एक डोस, तर ६७ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दुसर्‍या लाटेत मृत पावलेल्या ७५.२५ टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

राज्यातील १११ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ९८.०५ टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आत्तापर्यंत केवळ १७.०३ टक्के लाभार्थींनी डोस घेतला आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

८० टक्के मुलांना पहिला डोस
शालेय पातळीवरील १५ ते १८ वयोगटातील ८० टक्के मुलांना डोस देण्यात आला आहे. लसीबाबत पालकांत गैरसमज पसरवल्याने काहींनी आपल्या मुलांना डोस घेण्यास परवानगी दिलेली नाही, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

दोन डोस ७० टक्के, तर बूस्टर डोसमुळे ९० टक्के सुरक्षा
कोविड महामारीच्या तिसर्‍या लाटेत ओमिक्रॉनचा फैलाव होत असल्याने लसीकरण गरजेचे आहे. ज्या नागरिकांनी अजूनपर्यंत कोविड लस घेतलेली नाही, त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. कोविड लसीचे दोन डोस ७० टक्क्यांपर्यंत सुरक्षा देतात, तर बूस्टर डोस ९० टक्क्यांपर्यंत सुरक्षा देतो, असे डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.