तुरुंग प्रशासनाने कोेलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात छापा टाकून ७४ मोबाईल फोन, अमलीपदार्थ आणि रोख रक्कम काल हस्तगत केली.
तुरुंग प्रशासनाने कारागृहातील ४ विभाग आणि क्वारंटाईन विभागावर छापा घातला. त्यात एकूण ७४ मोबाईल फोन, मोठ्या प्रमाणात गांजा हा अमलीपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ आणि रोख २.३६ लाख रुपये एवढी रोख रक्कम आढळली.
कारागृहातील ब्लॉक १ मध्ये २ मोबाईल फोन, तंबाखूजन्य पदार्थ, चार्जर, ब्लॉक २ मध्ये १७ मोबाईल फोन, अमलीपदार्थ आणि रोख २ लाख रुपये, ब्लॉक ३ मध्ये २० मोबाईल फोन, अमलीपदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, ब्लॉक ४ मध्ये २६ मोबाईल फोन, रोख ३६ हजार रुपये, अमलीपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला आहे. क्वॉरंटाईन ब्लॉकमध्ये ९ मोबाईल फोन आढळून आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
राज्यातील मध्यवर्ती कारागृह नेहमीच विविध घटनांमुळे चर्चेत राहत आहे. या मध्यवर्ती कारागृहात यापूर्वी देखील अमलीपदार्थ, मोबाईल फोन आढळून आलेले आहेत. तसेच कारागृहात भांग पार्टी सुद्धा झाली होती.