पर्येत सासरे विरुद्ध सून लढत अपेक्षित

0
19

>> प्रतापसिंह राणेंकडून प्रचाराला सुरुवात; माघार घेतल्यास विजयादेवी राणे लढण्याची शक्यता

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी पर्येतील श्री भूमिका मंदिर व इतर मंदिरांमध्ये देवदेवतांचे दर्शन घेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला कालपासून सुरुवात केली. कॉंग्रेसने पर्येत प्रतापसिंह राणेंना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने त्यांचीच सून डॉ. दिव्या राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ऐनवेळी त्यांची पत्नी विजयादेवी राणे या सुद्धा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पर्येतील निवडणूक रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे.
पर्येतून निवडणूक लढण्याबाबत आतापर्यंत प्रतापसिंह राणेंची भूमिका तळ्यातमळ्यात अशी होती किंबहुना अजूनही ती तशीच आहे. ते लढणार की नाही, याबाबत साशंकता असतानाच काल सकाळी त्यांनी अचानक प्रचारास सुरुवात करुन सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. काल सकाळी त्यांनी पर्ये येथील श्री भूमिका मंदिर, केरीतील श्री आजोबा मंदिर व पर्येतील श्री म्हाळसा देवी मंदिरात प्रचाराचा नारळ ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतापसिंह राणे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्येत भाजपतर्फे दिव्या राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रतापसिंह राणेंनी उमेदवारी अर्ज भरला, तर मात्र सत्तरीच्या इतिहासात प्रथमच सासरे विरुद्ध सून अशी लढत पहावयास मिळणार आहे.
प्रतापसिंह राणे हे गेली ५० वर्षे पर्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राणे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांचे पुत्र, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वडिलांनी सन्मानपूर्वक राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे म्हटले होते. तसेच काही दिवसांपूर्वी प्रतापसिंह राणे व विश्वजित राणे यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती.
राज्य सरकारने राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपने पर्येतून त्यांची सून दिव्या राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते निवडणूक रिंगणातून माघार घेतील अशी अटकळ व्यक्त केली जात होती. मात्र सध्या तरी तसे काहीच चित्र दिसत नाही. ते गेले काही दिवस निवडणूक लढवावी की नाही, अशा द्विधा मनस्थितीत होते; मात्र आता प्रचाराला सुरुवात केल्याने त्यांनी लढविण्याचा निर्धार केला आहे, असे दिसून येत आहे.

उमेदवारी अर्ज भरणार का?
प्रतापसिंह राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी ते अर्ज भरणार का आणि अर्ज भरला तरी तो मागे घेणार की नाही, यावरच सासरे विरुद्ध सून लढतीचे चित्र ठरणार आहे. या लढतीचे चित्र ३१ जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ?
पर्ये मतदारसंघात प्रतापसिंह राणे किंवा विजयादेवी राणे विरुद्ध दिव्या राणे अशी लढत झाल्यास मतांची विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राणे कुटुंबातील दोन्ही उमेदवारांच्या पदरी निराशा येऊन अन्य उमेदवार विजयी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पर्येत सध्या आपचे विश्‍वजीत कृष्णराव राणे, तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे गणपत गावकर आणि शिवसेनेचे गुरुदास गावकर रिंगणात आहेत. त्यामुळे पर्येतील निवडणूक बरीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

…तर सासू विरुद्ध सून लढत
प्रतापसिंह राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे या काल प्रचाराच्या शुभारंभावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे राणे यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या निर्णयास त्यांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. ऐनवेळी प्रतापसिंह राणेंनी माघार घेतल्यास कदाचित विजयादेवी राणे या सुद्धा कॉंग्रेसच्या उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसे झाल्यास सासू विरुद्ध सून अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्यांचे पुत्र विश्‍वजीत राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.