पहिल्या दिवशी ३ उमेदवारी अर्ज

0
19

>> गोविंद गावडे, नीलेश काब्राल यांचे अर्ज दाखल

गोवा विधानसभेच्या १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

माजी मंत्री गोविंद गावडे यांनी काल प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर मंत्री नीलेश काब्राल यांनी कुडचडे मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, असे कुणाल यांनी सांगितले.

राज्यात ८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले मद्य, अमलीपदार्थ, रोख रक्कम आणि इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सुमारे २.४४ कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती कुणाल यांनी दिली.

राज्यात आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घरोघरी प्रचारासाठी केवळ ५ जणांना मान्यता देण्यात आली असून, सभागृहातील बैठकीसाठी ५० जणांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

केवायसी ऍपच्या माध्यमातून निवडणुकीतील उमेदवारांची माहिती मिळवली जाऊ शकते. या ऍपवर उमेदवारांची संपूर्ण माहिती अपलोड केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.