शिवसेनेचे ९ उमेदवार रिंगणात; आदित्य ठाकरे करणार प्रचार

0
12

शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ९ उमेदवारांची नावे काल जाहीर केली. शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केली. तसेच शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे हे गोवा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृवात गोव्यात शिवसेना प्रचार करेल, असे राऊत म्हणाले.
पणजी मतदारसंघात शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेने राज्य प्रमुख जितेश कामत यांना म्हापसा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. पेडणे मतदारसंघात सुभाष केरकर, शिवोली मतदारसंघात विन्सेट पेरेरा, हळदोणा मतदारसंघात गोविंद गोवेकर, पर्ये मतदारसंघात गुरुदास गावकर, वाळपई मतदारसंघात देविदास गावकर, वास्को मतदारसंघात मारुती शिरगावकर आणि केपे मतदारसंघात एलेक्सि फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विधानसभेच्या १२ जागा लढविण्यात येणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे.

…तर पणजीतील उमेदवार मागे घेणार
पणजी मतदारसंघात सध्या शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु पणजीमध्ये उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविल्यास शिवसेना आपला उमेदवार मागे घेणार आहे आणि उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.