>> अरविंद केजरीवाल यांच्याकडून घोषणा; भंडारी समाजाचा आजपर्यंत केवळ सत्तेसाठी वापर
आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा भंडारी समाजाचा असेल, असे ‘आप’ने आधीच सांगितले होते. त्यानुसार काल पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून ऍड. अमित पालेकर यांची निवड जाहीर केली. आपचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा पणजीतील एका खास कार्यक्रमात केली.
आम आदमी पक्षाने भंडारी समाजातील नेत्याला मुख्यमंत्री आणि ख्रिस्ती समाजातील नेत्याला उपमुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. त्या घोषणेला अनुसरून भंडारी समाजातील नेते ऍड. अमित पालेकर यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. ऍड. पालेकर हे सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.
गोव्यात भंडारी समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजातील नेत्याचा बड्या राजकीय पक्षांनी केवळ सत्तेसाठी वापर करून घेतला. भंडारी समाजावर आत्तापर्यंत झालेला अन्याय दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आप हा नवा पक्ष आहे. ज्यांनी कधीही निवडणूक न लढवली, अशा अनेक सामान्य गोमंतकीयांना आम्ही उमेदवारी दिली आहे. आम्ही गोव्याला एक चेहरा देत आहोत, जो सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाईल, असेही केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ऍड. अमित पालेकर यांचे नाव भरपूर चर्चेनंतर निश्चित करण्यात आले आहे. पालेकर यांच्यात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे.
- अरविंद केजरीवाल,
राष्ट्रीय समन्वयक, आप
गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची हमी आपण देतो. गोव्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे प्रत्येक गोवेकराचे स्वप्न आपण पूर्ण करेन. पक्षाने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करू याची ग्वाही आपण देतो.
- ऍड. अमित पालेकर,
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, आप.