मगो-तृणमूल आघाडी कायम

0
25

मगो-तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील निवडणूक आघाडी तुटण्याबाबतचे वृत्त खोडसाळ आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही राष्ट्रीय पक्ष अशा बातम्या पेरत आहेत. मगो-तृणमूल यांच्यातील निवडणूक आघाडी कायम आहे, असे स्पष्टीकरण मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल दिले.
मगो-तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील निवडणूक आघाडी तुटण्याबाबतची चर्चा काल समाज माध्यमांवर सुरू होती. भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगोच्या नेत्यांशी चर्चा करून तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी केलेली आघाडी तोडण्यास राजी केल्याचे एका वृत्तात म्हटले होते.

मगोची तृणमूल कॉंग्रेसशी निवडणूक आघाडीसंबंधी तुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त दिशाभूल करणारे व खोडसाळ आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही राष्ट्रीय पक्षांकडून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत. मगो तृणमूलशी केलेल्या निवडणूक आघाडीपासून मागे हटणार नाही. गोव्याच्या राजकारणात निश्‍चित बदल घडवून आणला जाईल, असे ढवळीकर म्हणाले. दरम्यान, मगो आणि तृणमूल कॉंग्रेसातर्फे शांतादुर्गा रवळनाथ मंदिरात शतचंडी व कुंकुमार्चन विधी करण्यात करण्यात आला.