>> संजय राऊत यांचे गोव्यातील विरोधी पक्षांना आवाहन
गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने उमेदवारी दिली नाही आणि उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असतील, तर गोव्यातील कोणत्याही विरोधी पक्षाने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा न करता त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन काल शिवसेनेचे खासदार तथा गोवा प्रभारी संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केले.
पणजी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी उत्पल पर्रीकर यांनी दावा केला आहे; परंतु भाजप त्यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत नसल्याचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.
उत्पल यांना उमेदवारी देण्यास तयार : वाल्मिकी नाईक
उत्पल पर्रीकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना पणजीतील उमेदवारी देण्याची तयारी आहे, असे आपचे पणजी मतदारसंघातील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल स्पष्ट केले. उत्पल पर्रीकर यांचे आम आदमी पक्षात स्वागत केले जाईल, असे आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा रविवारी जाहीर केले होते.
उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवत असतील, तर कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, आप व गोवा फॉरवर्डने त्यांच्याविरेाधात उमेदवार उभा करू नये. हीच स्व. मनोहर पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- संजय राऊत,
खासदार, शिवसेना