गोव्यात कोविडची तिसरी लाट फैलावत असून दक्षिण गोव्यात आरोग्य केंद्रावर तपासणीसाठी रांगा लागत आहेत. तसेच कोविडबाधितांची संख्या दर दिवशी मोठ्या संख्येने वाढत असल्याने कालपासून मडगाव येथील जुने हॉस्पिसियू इस्पितळ कोविड बाधितांसाठी सुरू केले. काल या इस्पितळात रुग्णांसाठी सर्व साधनसुविधा पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
मडगावबरोबर कांसावली, कुडतरी, लोटली, नावेली, बाळ्ळी, कुठ्ठाळी येथील आरोग्य केंद्रात दररोज कोविडबाधितांची संख्या वाढत आहे. नवीन जिल्हा इस्पितळ कोविडबाधितांना उपचारासाठी बंद केल्याने रुग्णांना बांबोळी येथील गोमेकॉत जावे लागत असे. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. कासावली इस्पितळात कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. पण नाताळच्या काळात ते इस्पितळ पूर्ण भरल्याने मोती डोंगरावरील टी. बी. इस्पितळात रुग्णांना पावण्यात येत असे. पण तेथे कोणत्याच सुविधा नाहीत.
या पार्श्वभूमीवर काल गुरूवारपासून जुने हॉस्पिसियो इस्पितळ खुले करून तेथे कोविड रुग्णांची सोय केली आहे. गोव्यात कोविडची संख्या कमी झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कोविड विभाग बंद केला होता.
हॉस्पिसियूत २०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असली तरी साधने अपुरी आहेत. प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता विभागाची तयारी करण्याचे काम जोरात सुरू झाले. डॉक्टर, परिचारिका तसेच काही कर्मचार्यांची नेमणूक केली आहे.