गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात भाजप पक्ष तळागाळात रूजवण्यास व पक्षाला राज्यात सत्ता मिळवून देण्याच्या कामास मोठे योगदान आहे. पण म्हणून त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पक्षाने उमेदवारी द्यायला हवी असा हट्ट धरणे हे योग्य नसल्याचे भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केले.
कोण कुणाचा पुत्र आहे हे पाहून आम्ही कुणाला उमेदवारी देत नसतो. भाजपची उमेदवारी देताना आम्ही त्या व्यक्तीचे कर्तृत्त्वही लक्षात घेत असतो, असे फडणवीस म्हणाले.
मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पक्ष येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार आहे की नाही, असा प्रश्न काल पत्रकारांनी फडणवीस यांना केला असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
पक्षाचा त्याग करून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री मायकल लोबो यांच्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, मतदारसंघात त्यांच्याविरोधात जे वारे वाहू लागले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला पुढील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मिळणार नाही, असे दिसून आल्याने त्यांनी पक्षाचा त्याग केला. त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी हवी होती. पण ती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते बिथरले होते, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधानांचा ताफा अडवणे
हा पंजाब सरकारचा कटच
५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौर्यावर गेले असता ते आपल्या ताफ्यासह ब्बल २० मिनिटे अडकून पडणे व नंतर त्यांना दौरा सोडून माघारी जावे लागणे हा पंजाब सरकारने घडवून आणलेल्या एका सार्वत्रिक कटाचा भाग होता ही बाब आता उघड होऊ लागली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. काही मोठ्या स्थानिक वृत्तपत्रांनी व वृत्त माध्यमांनी यासंबंधी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही बाब उघड झाली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. या सगळ्या कटाची पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना होती का याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
वाहनांचा ताफा अडून पडावा हे घडवून आणलेले कारस्थान होते हे या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट झाले असल्याचे फडणवीस म्हणाले.
पाक सीमा केवळ १० किमीवर
मोदी यांचा ताफा ज्या ठिकाणी अडकून पडला होता तेथून पाकिस्तानची सदहद ही केवळ १० कि. मी. एवढ्या अंतरावर असून पंतप्रधान तेथे २० मिनिटे अडकून पडल्याने त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता, असे फडणवीस म्हणाले. मात्र, एवढे सगळे होऊनही पंजांबमधील कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांना शोभत नसल्याचे सांगितले.