- – प्रा. रमेश सप्रे
१२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन. राष्ट्रीय युवा दिवस. स्वामीजींच्या काळात शे-दीडशे वर्षांपूर्वी पत्रलेखन हे मुख्यतः वैचारिक, भावनिक आदानप्रदानाचं मोठं प्रभावी माध्यम होतं. स्वामीजींनी आपल्या पत्रमंथनातून अक्षरशः मुर्दाड बनलेल्या मनाजीवनात अमृताचे कल्लोळ (लाटा) उठवले होते. त्या पत्ररूप विवेकानंदांची ही एक झलक.
…………………………
या जन्मदिनाच्या निमित्तानं देह-मनाच्या पातळीवर ‘युवा’ असणार्या युवक-युवतींना सलाम!
- देहाच्या दृष्टीनं चाळीस वर्षाखालील व्यक्तीला युवा समजलं जातं. यानुसार जगातील सर्वांत तरुण राष्ट्र भारत आहे. कारण आपल्या तरुणाईची कक्षा नि तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे. अशा वर्गाला उद्देशून चिरयुवा स्वामीजींनी शेकडों पत्र विविध देशातून लिहिली. त्यांचा विशाल संग्रह पुस्तकरूपात अनेक भाषात उपलब्ध. स्वामीजी चिरयुवा होते कारण ते आयुष्याच्या चाळीशीच्या आतच आपलं हिमालयाएवढं उंच- महासागराहून खोल आणि विश्वाच्या विस्तारापेक्षाही विस्तृत कार्य करून महासमाधी घेते झाले.
- दूरदर्शन- संगणक- लॅपटॉप या सर्वांमुळे क्रमाक्रमाने बंद पडत चाललेले अनौपचारिक पत्रलेखन मोबाइल आल्यानंतर तर इतिहासजमा झाल्यासारखं आहे. पण स्वामीजींच्या काळात शे-दीडशे वर्षांपूर्वी पत्रलेखन हे मुख्यतः वैचारिक, भावनिक आदानप्रदानाचं मोठं प्रभावी माध्यम होतं. स्वामीजींनी आपल्या पत्रमंथनातून अक्षरशः मुर्दाड बनलेल्या मनाजीवनात अमृताचे कल्लोळ (लाटा) उठवले होते. त्या पत्ररूप विवेकानंदांची ही एक झलक.
युवावर्गाला आवाहन…
- त्या काळच्या मद्रास प्रांतातील युवकांनी संघटित रूपात प्रयत्न करून स्वामीजींना सर्वधर्मपरिषदेसाठी अमेरिकेला पाठवण्यात पुढाकार घेतला होता. – अर्थातच आपल्या प्रवासाचं वर्णन करणारं एक प्रदीर्घ पत्र स्वामीजींनी लिहिलंय. त्यात स्वामीजी तरुणांना आवाहन करताहेत. – ‘या, तुम्ही सारेजण माणूस बना. आपल्या छोट्याशा डबक्यातून बाहेर पडा. आपल्या देशावर तुमचं प्रेम असेल तर अधिक उन्नत होण्यासाठी प्राण पणास लावून झटू या. मागे वळू नका, पुढे चला, पुढे चला!’
आत्मपरीक्षण….
- आपल्या गुरुबंधूंना (जे सारे स्वामीजींसारखेच तरुण होते) उद्देशून लिहिलेल्या पत्रात- आपसातील मत्सराचा त्याग करून एखाद्या कार्यासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही हा आपला मोठा राष्ट्रीय दुर्गुण आहे- ते आपले राष्ट्रीय पाप आहे!
कार्यप्रेरणा …
- स्वामीजींचा युवा मद्रासी साथी अलासिंगा पेरुमल याला उद्देशून –
मासिके, वर्तमानपत्रे इ. चालू करणे ठीक आहे, पण अगदी थोडे जरी असले तरी प्रत्यक्ष कार्य हे सदैव चालणार्या वटवटीपेक्षा नि कलमबाजीपेक्षा केव्हाही अधिक चांगले होय.
दिव्यवाणी …
- सर्वधर्मपरिषदेत केलेल्या त्या ऐतिहासिक व्याख्यानारंभी श्रोत्यांना उद्देशून केलेल्या ‘माय् अमेरिकन् सिस्टर्स अँड ब्रदर्स’ या संबोधनानंतर स्वामीजी आपल्याला मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल आपल्या गुरुबंधूंना लिहितात- ‘ज्या कुण्या शहरी मी जातो तेथे खूप धामधूम माजते. येथील लोकांनी मला ‘द सायक्लॉनिक हिंदू’ (तुफानी हिंदू) असे नाव दिले आहे. पण लक्षात ठेवा ही सारी प्रभूची (रामकृष्णांची) इच्छा. ख रा र र्ींेळलश ुळींर्हेीीं षेीा. मी व्यक्ती नाही तर निराकार वाणी बनून राहिलोय’.
नारीशक्ती…
- आपल्या युवा गुरुबंधूंना उद्देशून लिहिलेल्या अनेकानेक पत्रात भक्ती, उपासना, ध्यान धारणा यापेक्षा समाजाचं दारिद्य्र घालवून जनसामान्यांचं चारित्र्य घडवण्यासाठी मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणतात –
‘श्रेयांसि बहुविघ्नानि’ म्हणजे चांगल्या कार्यात अनेकविध संकटं येणारच. पण त्यांचं संधीत रूपांतर करू या. तेथील स्त्रियांविषयी स्वामीजी अभिमानाने लिहितात- ‘येथील स्त्रिया पाहून मी आश्चर्यानं थक्क होतो. त्यांच्यावर जगदंबेची केवढी कृपा आहे! त्यांनी पुढे जाण्याच्या शर्यतीत पुरुषवर्गाला जवळजवळ हरवलं आहे. आपणही स्त्रीपुरुष भेद आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. सर्व काही आत्माच आहे. आत्म्याला काय लिंग असतं? सार्यांचा स्वीकार करा. म्हणा- अस्ति अस्ति’.
चारित्र्यनिर्माण …
- युवकांना चारित्र्यनिर्माणाबद्दल सांगताना स्वामीजी लिहितात- ‘पुढील दोन गोष्टींविषयी सावध राहा- अधिकारलालसा आणि मत्सर. त्यापेक्षा आत्मविश्वास अंगी बाणावा. लक्षात ठेवा- विस्तार पावणं हेच जीवन, संकोच पावणं हा मृत्यू!
प्रेम हेच जीवन, घृणा (तिरस्कार) म्हणजेच मृत्यू.
आदर्श जीवन … - आपले गुरुबंधू नि असंख्य युवक-युवतींना उद्देशून स्वामीजी प्रेरणा देतात – संख्या, सत्ता, संपत्ती, विद्वत्ता, वक्तृत्व यांच्यापेक्षा प्रभावी आहेत चारित्र्य, आदर्श जीवन आणि प्रत्यक्षानुभूती (सेल्फ रियलायझेशन). जे संपत्ती, सत्ता, नावलौकिक यांची पर्वा करीत नाहीत असे दहा- शंभर – सहस्त्र पुरुषसिंह जरी मिळाले तरी नवा भारत घडवता येईल.
आत्मनिवेदन …. - आपली मानसकन्या भगिनी निवेदिता (मार्गारेट नोबल) हिला मनातले विचार सांगताना- ‘आपण जाळ्यात पकडले गेलो आहोत. जितक्या लवकर त्यातून बाहेर पडू तितकं चांगलं. लोकांपासून दूर, निवांत स्थानी ग्रंथ वाचीत बसणार्या एखाद्या विद्याव्यासंगी व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करण्यासाठीच खरे पाहता माझा जन्म झालाय. पण जगन्मातेची इच्छा निराळीच आहे. तरीही माझी मूळची प्रवृत्ती कायम आहे.’
बोधचिन्ह … - आपल्या एका अमेरिकन शिष्येला लिहिलेल्या पत्रात ‘रामकृष्ण संघा’च्या बोधचिन्हाविषयी लिहितात- ‘सूर्य म्हणजे ज्ञान. जोराने उसळणारे पाणी म्हणजे कर्म (जीवन). कमळ म्हणजे भक्ती. सर्प म्हणजे योग. हंस म्हणजे परमात्मा. यावर आधारित प्रार्थना (बोधवाक्य)- ‘तन्नो हंसः प्रचोदयात्’ तो हंस (परमात्मा) आम्हाला प्रेरणा देवो. हे सरोवर हे मनाचं सरोवर आहे – मानस सरोवर!
अशा प्रकारे नव्या भारताचं स्वप्न साकार करणार्या युवा नेत्यांकडे असणारे गुण त्यांच्या कार्याचे विविध पैलू आणि आपल्याला होणारं समर्थसंपन्न भारताचं भावदर्शन- असं सर्वस्पर्शी विश्व स्वामीजींच्या दिव्य वाणीप्रमाणेच त्यांच्या लेखणीतूनही व्यक्त होतं. पत्रांच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद जसे तीर्थरूप आहेत तसेच पत्ररूपही आहेत. त्यांची सर्व पत्रं भाषणं वाचण्याचं अभिवचन आजच्या दिवशी त्यांना देऊ या.