>> आरोग्यविषयक सुविधांसाठी दहा वर्षात एक हजार कोटीचा निधी खर्च
कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सज्ज व सक्षम आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. मात्र इस्पितळात दाखल होणार्यांची संख्या कमी असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, गेल्या दहा वर्षांच्या काळात आरग्यविषयक प्रश्नांवर व सोयीसुविधांवर तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले. २०१२ साली गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे सरकार ते सध्याच्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या गेल्या दहा वर्षात आपण राज्याचा आरोग्यमंत्री असताना आरोग्यविषयक साधनसुविधा व सुधारणा यावर तब्बल १ हजार कोटी रु.पेक्षा जास्त निधी खर्च केल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. ह्या दहा वर्षांत राज्यात उभ्या राहिलेल्या आरोग्यविषयक प्रमुख प्रकल्पात गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी इस्पितळ, नवे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ, गोमेकॉतील अत्याधुनिक व सुसज्ज हृदयरोग विभाग, ग्रामीण भागात झालेला वैद्यकीय सेवांचा विस्तार व उभारलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे, गोवाभरात उभारण्यात आलेली वैद्यकीय सेवेसाठीची आणीबाणी केंद्रे, १०८ रुग्णवाहिका सेवा, यासह मूत्रपिंड रुग्णांसाठी उभारलेली डायलिसीसची सुविधा, तसेच कोविड महामारीच्या काळात गोमेकॉत चाचणीसाठी उभारण्यात आलेली जीवरेणुशास्त्र प्रयोगशाळा, प्राणवायूची केलेली सोय तसेच कोविडसाठी लागणारी औषधे व साहित्य यांची खरेदी करण्यात आली. त्याशिवाय गोमेकॉत ‘कॅथ लॅब’ची सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्करोग इस्पितळ
आता २७० कोटी रु. खर्चून गोमेकॉमध्ये कर्करोग इस्पितळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून येत्या वर्षभरात ह्या इस्पितळाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी इस्पितळ अवघ्या १४ महिन्यात उभारण्यात आले. आता कर्करोग इस्पितळही वर्षभरात उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मोफत औषधे देणारे गोवा एकमेव राज्य
सरकारी इस्पितळांत उपचार घेणार्या रुग्णांना मोफत औषधे पुरविणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे. सरकारी इस्पितळात उपचार घेणार्या रुग्णांना दरवर्षी १२० कोटी रु.ची औषधे पुरवण्यात येत असल्याचे राणे म्हणाले.
समुपदेशन केंद्रेही उभारणार
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन यांच्याबरोबरच मुलांचाही मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असून या पार्श्वभूमीवर गोमेकॉत समुपदेशन केंद्रे सुरू करण्याचा विचार असल्याची माहितीही राणे यांनी दिली.