चोवीस तासांत राज्यात १००२ कोरोनाबाधित

0
19

>> रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १७.७२ टक्के

>> इस्पितळात १३ बाधितांना दाखल

राज्यात कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नवीन १००२ बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १७.७२ टक्के एवढे आहे. याच काळात एका कोरोनाबाधिताचा बळी गेला आहे. राज्यातील इस्पितळांमध्ये दाखल होणार्‍या बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ३७१८ एवढी झाली आहे. तर राज्यातील कोरोना बळींची संख्या ३५२६ एवढी झाली आहे.

पणजी, मडगावात रुग्णसंख्या ४०० वर
राजधानी पणजीसह मडगाव, पर्वरी, म्हापसा, कासावली, वास्को आदी भागातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मडगाव येथे सर्वाधिक ४८१ बाधित आहेत. पणजीतील बाधितांची संख्या ४६५ वर पोहोचली आहे. कासावली येथे २८६, पर्वरी येथे २५७, म्हापसा येथे २१९, कुठ्ठाळी येथे १९०, वास्को येथे १८८, चिंबल येथे १६४, शिवोली येथे १६२, फोंडा येथे १४७, कांदोळी येथे १३१, लोटली येथे १२० बाधित आहेत. राज्यातील इतर भागांतही बाधिताची संख्या वाढत आहे.

इस्पितळात १३ दाखल
चोवीस तासांत नवीन १३ बाधितांना इस्पितळामध्ये दाखल करून घेण्यात आले आहेत. यापूर्वी इस्पितळामध्ये दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या कमी होती. काल एकदम १३ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तर, इस्पितळामधून बरे झालेल्या ११ जणांना घरी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ५६५३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १००२ नमुने बाधित आढळून आले आहेत.

राजकीय प्रचारसभा सुरूच
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे जोरात सुरू आहेत. राजकीय पक्षांच्या सभांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात जिनॉम सिक्केन्सिंग
यंत्रणा लवकरच ः आरोग्यमंत्री

राज्यात ओमिक्रॉनच्या तपासणीला गती देण्यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंत जिनॉम सिक्केन्सिंग यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतली जात आहे. सरकारने नियुक्त तज्ज्ञ समितीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शिफारशी केल्या जात आहेत, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
गोमेकॉतील नोकरभरतीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नोकरभरतीसाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात आली असून नोकरभरती गुणवत्तेनुसार केली जात आहे, असा दावा मंत्री राणे यांनी केला.

राज्यात ओमिक्रॉनचे १९ रूग्ण
राज्यात ओमिक्रॉनबाधितांचा धोका वाढत आहे. राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या १९ एवढी झाली आहे. आणखी ८ प्रवासी ओमिक्रॉनबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यात इंग्लंडमधून आलेले ३ प्रवासी असून ५ बाधित स्थानिक आहेत. त्यांनी प्रवास केलेला नाही. ते मडगाव, चिंचिणी, काणकोण व बार्देश येथील रहिवासी आहेत. ओमिक्रॉनबाधित बहुतेक रुग्ण विदेशातून आले आहेत. ओमिक्रॉनबाधितांचे तपासणीसाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात.

सातवी ते बारावीचे वर्ग ऑनलाइन
करण्याची शिक्षण खात्याची सूचना

शिक्षण खात्याने काल काढलेल्या एका आदेशाद्वारे सातवी ते बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाइन घेण्यात यावेत, अशी सूचना सर्व शैक्षणिक संस्थांना केली आहे. १५ ते १८ ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना केवळ लस घेण्यासाठी विद्यालयात बोलावण्यात यावे, असे शिक्षण खात्याने आपल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.

आरोग्य खात्याने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याला कोरोनाच्या तिसर्‍या लाटने धडक दिली असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर काल शिक्षण खात्याने सातवी ते बारावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग हे ऑनलाइन घेण्यात यावेत अशी काल सूचना केली.

शिक्षण खात्याने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्यात कोविडची तिसरी लाट ही डिसेंबरपासून आल्याचे म्हटले होते. तसेच कोविडचा वर वर येत चाललेल्या आलेख खाली आणण्यासाठी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच कोविड ननियमावलीचे पालन केले जावे, अशी सूचना केली होती.