कोरोना राज्यात पुन्हा डोके वर काढू लागला असल्याचे स्पष्ट दिसत असूनही राज्य सरकारने गेल्या वर्षअखेरीस जनता आणि पर्यटकांवर किमान निर्बंध लागू करण्यात जी चालढकल केली, त्याची परिणती म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे आणि ती अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्याचा वेग विचारात घेतला तर जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत येथील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या तब्बल दहा हजारांच्या घरात जाऊ शकते अशी भीती राज्याचे महामारीविषयक तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनीच व्यक्त केलेली आहे. डॉ. बेतोडकर यांनी व्यक्त केलेली ही भीती नक्कीच अनाठायी नाही.
कोरोना रुग्णवाढीची गेल्या सात दिवसांतील आकडेवारी तपासली तर असे दिसेल की सक्रिय रुग्णसंख्या अवघ्या तीन दिवसांत दुप्पट होत चालली आहे. गेल्या २८ तारखेला ती पाचशेच्या घरात होती. ३१ डिसेंबरलाच ती हजारांवर गेली आणि आता तीन दिवसांनंतर ती दोन हजारांचा टप्पा गाठत आहे. नवे रुग्ण सापडण्याचा हा वेग नक्कीच चिंताजनक आहे. कोरोनाची दुसरी लाट उफाळली होती तेव्हाच राज्यात एवढ्या वेगाने सक्रिय रुग्णसंख्या वाढत होती. गेल्या वर्षी जानेवारीत नवे रुग्ण सापडण्याची मासिक सरासरी रोज केवळ ७५ रुग्ण एवढी होती. मार्चमध्ये ती रोज १०५ रुग्ण एवढी वाढली होती, परंतु त्यानंतर एप्रिलपासून दुसर्या लाटेचा जो कहर राज्यात झाला तो प्रचंड होता. एप्रिलमधील नव्या रुग्णांची मासिक सरासरी दिवसाला ७६७ रुग्ण एवढी प्रचंड होती. आपल्याला राज्याला पुन्हा त्या स्थितीला न्यायचे आहे का याचा विचार सरकारने गांभीर्याने करायला हवा. गेल्या सात दिवसांचा टेेस्ट पॉझिटिव्हिटी दर सरासरी तब्बल ६.६ टक्के आहे. पुढील सात दिवसांत तो त्याहून कितीतरी अधिक असेल याची खूणगाठ आताच मनाशी बांधून ठेवा. कालची सरासरी तर सव्वीस टक्क्यांवर गेली आहे. साप्ताहिक सरासरी आठ टक्क्यांवर गेली तर राज्यामध्ये जनतेवर अत्यंत कडक निर्बंध घालण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना पाठवलेल्या लेखी पत्रात यापूर्वीच दिलेली आहे. ती वेळ आता फार दूर नाही.
विविध राज्य सरकारांनी खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या वर्षअखेरीपूर्वीच रात्रीची संचारबंदी वगैरे लागून कोरोनाचा नवा संसर्ग आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. गाफील राहिले ते केवळ गोवा सरकार. गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य असल्याचा बाष्कळ बचाव घेऊन राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षाच्या धामधुमीला रान मोकळे करून दिले, त्याची फळे आज गोव्याला भोगावी लागत आहेत. माध्यमांनी आवाज उठवला तेव्हा केवळ कॅसिनोंना पन्नास टक्के उपस्थिती लागू करण्याशिवाय सरकारने कोणतीही खबरदारी घेतली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उद्या संपूर्ण लॉकडाऊनची वेळ ओढवली तर त्याला ही बेफिकिरीच जबाबदार असेल.
कृतिदलाच्या कालच्या बैठकीत सद्यपरिस्थितीत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याची व रात्रीच्या संचारबंदीची शिफारस सरकारला करण्यात आली. मात्र, हे निर्बंध सात तारखेपासून लागू केले जातील असे सरकारतर्फे सांगण्यात आले. वेगवान निर्णय आवश्यक असताना आता पुन्हा हा सात तारखेचा मुहूर्त कशासाठी? रात्रीची संचारबंदी लागू करतानाही ती रात्री अकरानंतर लागू केली जाणार आहे. हे अतिशय हास्यास्पद आहे. कॅसिनो आणि मद्यालयांच्या सोयीसाठीच ही अकराची वेळ निवडली गेली आहे हे उघड आहे. काल गोव्यात पुन्हा ओमिक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे त्यात एक स्थानिकही आहे. ही बाब चिंताजनक आहे. स्थानिक जनतेमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला असेल तर डेल्टापेक्षा तो तिप्पट अधिक संसर्गजन्य असल्याने नवे रुग्ण त्या पटीने वाढू शकतात. सध्या जी रुग्णवाढ दिसते त्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाटा किती हे स्पष्ट नाही, कारण आपल्याकडे जिनॉम सिक्वेन्सिंग करणारे यंत्र नाही. हे यंत्र आणण्याची घोषणा दुसर्या लाटेनंतर आरोग्यमंत्र्यांनी केली होती. आता कुठे ते आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आग लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे!
सरकारचे निर्णय वेगाने व्हायला हवेत. तज्ज्ञ समिती शिफारस करणार, मग कृतिदल त्यावर आपले मत देणार, आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांपुढे विषय मांडणार, मग मुख्यमंत्री निर्णय घेणार, मग परिपत्रक निघणार हा द्रविडी प्राणायाम आणि त्यातून निष्कारण निर्माण होणारा सावळागोंधळ टाळून युद्धपातळीवर धडाडीने निर्णय घ्या. नेहमीची ‘सुशेगाद’ वृत्ती राज्याला कशा प्रकारे संकटाच्या खाईत लोटते त्याचा धडा दुसर्या लाटेने दिलेला नाही काय?