>> निवडणूक आयोगाकडून स्पष्ट
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यावेळी कोरोनाची रूग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. तसेच ओमिक्रॉनचा धोकाही देशभरात वाढत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली जात होती. मात्र, उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने देशभरातील पाच राज्यांमध्ये होणार्या निवडणुका पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे स्पष्ट केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा केली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुका नियोजित वेळेतच घेतल्या जाव्यात, अशी भूमिका मांडली असल्याचे चंद्रा यांनी सांगितले.
मतदानाचा कालावधी वाढवला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी वाढवण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. या निवडणुकांसाठी मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्ये मतदान होणार असल्याचे चंद्रा यांनी यावेळी स्पष्ट केले.
आठ राज्यांना केंद्राच्या सूचना
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला या आठ राज्यांनी आपापल्या परीने कोरोना विरोधात कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल असे पत्र लिहिले आहे.
आरोग्य सचिवांनी या ८ राज्यांना कोरोनाविरोधात कठोर पावले उचला तसेच कोरोना चाचणी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला पत्रातून देण्यात आला आहे.