पत्नी डिलायलाला शिवोलीतून आमदार बनविण्याचा विडा उचललेले मंत्री मायकल लोबो यांनी आपल्याच पक्षनेत्यांवर आरोपांची बेछूट फैर झाडत घरचा आहेर दिला आहे. पक्षात मनोहर पर्रीकरांना मानणार्यांची उपेक्षा केली जात आहे, पक्षनेत्यांची अरेरावी चालली आहे, निष्ठावंतांना, सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात काडीचेही स्थान राहिलेले नाही वगैरे जोरदार आरोपांची तोफ लोबोंनी डागली आहे. अर्थात, मायकल परखडपणासाठीच ओळखले जातात. राज्यातील कोणत्याही प्रश्नावर आपली स्पष्ट टिप्पणी देण्यास ते कधीच कचरत नाहीत. टॅक्सीवाल्यांचे आंदोलन असो, राज्याचा खाण प्रश्न असो, आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करायला ते यापूर्वीही कधीच कचरलेले नाहीत. आज ज्या पर्रीकरांचे नाव घेत त्यांचा वारसा ते सांगत आहेत, ते मुख्यमंत्री असतानाही लोबोंची वाचाळता काही कमी नव्हती. समुद्रकिनार्यावर होणार्या मद्यप्राशनाबाबत अधिसूचना काढण्यात दिरंगाई केल्याबद्दल पर्रीकरांनाच दोषी धरणारे वक्तव्यही लोबोंनी तेव्हा केलेले होते. निवडणुकीत आपले ऐकले नाही म्हणून आठ मंत्री घरी बसले हे सांगायलाही तेव्हा त्यांनी कमी केलेले नव्हते. २०१७ च्या निवडणुकीनंतर सरकार घडवण्यात आपला ‘किंगमेकर’चा महत्त्वाचा वाटा असूनही आपल्याला मंत्रिपद दिले गेले नाही, तर उपसभापतीपदावर बोळवण करण्यात आली म्हणून लोबोंनी सुरवातीच्या काळात जो थयथयाट केला किंवा मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्याजागी मिलिंद नाईकांची वर्णी लावली गेली, तेव्हा आपल्याला मंत्रिपद दिले जात नाही म्हणून लोबो किती संतापले होते हे जगजाहीर आहे. शेवटी कचरा खात्याचे का होईना त्यांना मंत्रिपद मिळाले. परंतु तरीही अधूनमधून आपल्याच सरकारवर दुगाण्या झाडण्यात ते कधीच मागे राहिले नाहीत.
लोबो एवढे स्पष्टपणे आणि परखडपणे बोलू शकतात, कारण त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या विजयात पक्षाचा काहीही वाटा नाही. ते स्वतःच्या बळावर तेथून सातत्याने निवडून येत राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल तपासले तर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गावातील काही मतदान केंद्रे वगळता प्रत्येक मतदानकेंद्रावर लोबोंनी कशी जोरदार आघाडी घेतली होती हे दिसेल. केवळ आपल्या मतदारसंघावरच नव्हे, तर आजूबाजूच्या मतदारसंघांवरही आपला प्रभाव निर्माण करण्यात लोबोंनी गेली पंधरा वर्षे प्रयत्न केले आणि त्यात ते बर्यापैकी यशस्वीही ठरले आहेत. त्यामुळे आपण कितीही तोफ डागली तरी पक्ष आपले काहीही वाकडे करू शकणार नाही हे लोबो पुरेपूर जाणून आहेत. शिवाय तशीच वेळ आली तर पक्षाला खुंटीवर टांगायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांच्या या अशा महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळेच गेल्या निवडणुकीवेळी त्यांचे किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बनावट दाखल्याचे एक जुने २००६ मधील प्रकरण उकरून काढण्यात आलेले होते. आता यावेळीही लोबोंना आवरण्यासाठी अशी काही प्रकरणे निवडणुकीच्या तोंडावर बाहेर आली तर आश्चर्य वाटू नये. ईडीपासून सीडीपर्यंतच्या यंत्रणा एव्हाना लोबोंचा गतइतिहास धुंडाळू लागलेल्या असतीलच.
मायकल यांनी जेव्हा पत्नी डिलायलाच्या प्रचारात स्वतः उघडपणे उडी घेतली तेव्हा त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीबाबत भाजप श्रेष्ठींशी काही समझोता झाला आहे असेच चित्र निर्माण झाले होते, कारण शेवटी पाण्यात राहून माशांशी वैर करता येत नसते. परंतु मायकल सध्या तरी पक्षनेत्यांना पुरून उरले आहेत.
आपल्या पत्नीलाही उमेदवारी द्या ही त्यांची मागणी कितपत योग्य हा भाग वेगळा, ‘इतरांना देताय, तर मलाही द्या’ हे त्यांचे म्हणणेही बालिशपणाचे आहे, परंतु त्यांनी जे घणाघाती आरोप पक्षावर व पक्षनेत्यांवर केले आहेत, ते कडू घोट जर पक्ष निमूटपणे गिळणार असेल तर त्यातून पक्षाची व पक्षनेत्यांची हतबलताच उघड होईल.
लोबो केवळ पत्नीलाच शिवोलीची उमेदवारी जाहीर करून थांबलेले नाहीत, तर म्हापशातून सुधीर कांदोळकरांची उमेदवारीही त्यांनी जाहीर केलेली होती हे विसरले जाऊ नये. कांदोळकर हे आता कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. पर्वरी आणि हळदोण्यामध्येही मायकल आपले उमेदवार येत्या निवडणुकीत उतरवणार आहेत. त्यामुळे अशा विस्तारवादी महत्त्वाकांक्षी नेत्याला वेसण घालण्यासाठी भाजप नेतृत्व काय करणार हे पाहावे लागेल. मायकल यांच्या आरोपांमागे भले त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल, परंतु पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची खंतच त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेली आहे हे विसरून चालणार नाही. हा घरचा आहेर आता पक्ष निमूट स्वीकारतो की पलटवार करतो ते पाहू!