भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही

0
17

>> कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांची टीका

भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना किंमत राहिलेली नाही. आम्ही करू ती पूर्व अशी वृत्ती काही नेत्याची बनली आहे. साळगाव, पर्वरी मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या वृत्तीचा अनुभव घेतला आहे. आमचा निर्णय मान्य नसल्यास पक्षातून चालते व्हा, असेही काही कार्यकर्त्यांना सांगण्यात आल्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.

मायकल लोबो यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी देऊ नये म्हणून भाजपमधील एक गट कार्यरत झाला आहे. मला भेटण्यासाठी येणारे अनेक जण भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगतात. तथापि, पक्षाचे अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांनी मला उमेदवारी मिळणार नाही, असे सांगितलेले नाही. मी उमेदवारीच्या शर्यतीत नाही. मला लोकांचे तिकीट मिळाले पाहिजे, असे पुढे बोलताना लोबो यांनी सांगितले. निवडणूक जवळ जवळ येत आहे तसतसे मंत्री लोबो आक्रमक बनत चालले आहेत. शिवोली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार्‍या पत्नी डिलायला लोबो यांच्या प्रचारात मायकल लोबो सहभागी होत आहेत.

पर्रीकरांच्या काळातील भाजप वेगळा होता
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात असे प्रकार होत नव्हते. पर्रीकर सर्वांना विश्वासात घेऊन मतभेदावर तोडगा काढण्याचे काम करीत होते. आज भाजपचे व्यावसायिकरण झाले आहे. भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला नाही. पर्रीकर यांना मानणार्‍या नेत्यांना दुर्लक्षित केले जात आहे, असा आरोप मंत्री लोबो यांनी केला.