>> कोरोनाप्रतिबंधक गोळीलाही आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी
देशात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेताना कोरोनावरील आणखी दोन लशींना एकाच दिवशी मंजुरी दिली आहे. तसेच मोलनुपिरावीर या गोळीच्या वापरालाही मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने कोरोनावरील कॉर्बेवॅक्स आणि कोवोवॅक्स या दोन लशींसह मोलनुपिरावीरला या औषधालाही मंजुरी दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोवोवॅक्स लस उत्पादनाची जबाबदारी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक भक्कम पाऊल टाकत, आम्ही कॉर्बेवॅक्स लस आणि कोवोवॅक्स लस या दोन लशींसह अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीरलाही मंजुरी दिली आहे. या औषधांना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे मांडवीय यांनी म्हटले आहे. मोलनुपिरावीर ही करोनावरील गोळी आहे.
तिसर्या डोससाठी डॉक्टरांच्या
प्रमाणपत्राची गरज नाही
येत्या ३ जानेवारीपासून देशात १५ ते १८ वर्षांच्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तसेच १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिसरा डोस दिला जाणार आहे. या डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. परंतु ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तिसरा डोस घेण्याअगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व नंतरच डोसबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मात्र आरोग्य मंत्रालयाने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीच्या दृष्टीने केंद्र सरकारने ही सूचना केली आहे.
कोरोनावरील लशीचा हा तिसरा डोस घेण्यासाठी दुसर्या आणि तिसर्या डोसमधील अंतर ३९ आठवडे पूर्ण झालेले आणि हे ९ महिन्यांचे असावे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १५ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लसीकरणासाठी मुलांना ऑनलाइनही अपॉइंटमेंट घेता येईल किंवा केंद्रावर जाऊनही लस घेता येईल. पण लसीकरण केंद्रावर लशींचा साठा उपलब्ध असल्यावरच डोस मिळू शकेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय निवडणुका होणार्या राज्यात सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांचाही फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि हृदयाचे गंभीर आजार असणार्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना हा डोस दिला जाणार आहे.
ओमिक्रॉनमुळे दिल्लीत
यलो अलर्ट जारी
पुन्हा एकदा देशावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या संसर्गाचे सावट उभे ठाकले आहे. या विषाणूचा १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रसार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढत असल्याने केजरीवाल सरकारने हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच दिल्लीत काही गोष्टींवर बंदी घातली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जरी बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात जाण्याची गरज नसली, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटरची गरज नाही. तरीही ओमिक्रॉन संक्रमित लोक घरीच बरे होत असल्याचे केजरीवाल म्हणाले.