तिसर्‍या लाटेचा धोका

0
31

सरत्या वर्षासरशी कोरोनाचे संकट संपुष्टात येण्याची व्यक्त केली जात असलेली शक्यता ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नव्या संकटामुळे पार मावळली आहे. जगभरात ह्या नव्या व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, ते पाहता चिंता वाटू लागली आहे. नव्या व्हेरियंटच्या संसर्गामुळे अवघ्या दीड ते तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. हा कल असाच राहिल्यास जानेवारीअखेर ते फेब्रुवारीच्या प्रारंभापर्यंत जगभरातील बहुतेक देशांतील रुग्णसंख्येत कमालीची वाढ होण्याची व इस्पितळे रुग्णांनी ओसंडून वाहू लागण्याचा धोका आहे. भारतामध्येही ओमिक्रॉन रुग्णांची संख्या बघता बघता वाढते आहे आणि प्रमुख शहरांतून हे लोण आता छोट्या शहरांपर्यंत येऊन ठेपलेले दिसते. विदेशांत राहणारे गोमंतकीय नाताळनिमित्त मोठ्या संख्येने राज्यात परतलेले असल्याने हे लोण गोव्यातही पसरायला वेळ लागणार नाही. एकीकडे विदेशांतून विशेषतः ब्रिटन आणि युरोपीय देशांतून मायदेशी परतलेले गोमंतकीय आणि दुसरीकडे गोव्याकडे लोंढ्यांनी लोटू लागलेले देशी – विदेशी पर्यटक यामुळे गोव्यावर हे दुहेरी संकट आहे.
ओमिक्रॉनच्या या नव्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने काय सज्जता केलेली आहे? सरकारनियुक्त कृतिदल आणि तज्ज्ञ समितीची एकूण भूमिका सरकारच्या सुरांत सूर मिसळण्याचीच राहिलेली आहे. सरकारला चार खडे बोल सुनावण्याची हिंमत या तज्ज्ञांंमध्ये नाही. त्यामुळे येथील बदलत चाललेल्या परिस्थितीबाबत जनतेनेच अधिक दक्ष, अधिक सतर्क बनणे नितांत गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गोव्यात काय हलकल्लोळ माजला त्याच्या आठवणीही आज नकोशा वाटतात. कुटुंबेच्या कुटुंबे त्या दुसर्‍या लाटेच्या तडाख्यात सापडली. तेव्हाही आधल्या वर्षअखेरीस असाच कोरोना संपुष्टात आल्याचा भ्रम जनतेमध्ये पसरलेला होता. त्यातून निष्काळजीपणा वाढला होता. मात्र, दुसरी लाट एप्रिल मे महिन्यात अशी उफाळली की जनता हादरून गेली. आता तर निवडणुकांचे दिवस आहेत. कोणाचा पायपोस कोणात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशावेळी कोरोनाची तिसरी लाट धडकली तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही.
डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन सौम्य असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी सुरवातीला काढला होता. परंतु अत्यंत अपुर्‍या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला गेला होता. डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनची संसर्गजन्यता तब्बल सत्तर पट अधिक आहे यावरून संसर्गाचा वेग लक्षात येईल. मानवी पेशीत शिरकाव करण्यास कोरोनाचा हा व्हेरियंट अधिक सरावलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सार्वजनिक वावरावर पुन्हा कडक निर्बंध आणले गेले नाहीत तर बघता बघता होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही. नेत्यांना निवडणुकांत अधिक रस आहे. त्यामुळे हे निर्बंध घालण्यात चालढकल होईल हे उघड आहे. परंतु जे आवश्यक आहे त्याचा आग्रह जनतेनेही धरावा लागेल. अन्यथा परिस्थिती पुन्हा बिघडेल आणि एकदा बिघडलेली परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईस्तोवर काय वाताहत आणि पडझड होते त्याचा अनुभव यापूर्वीच्या दोन लाटांत आपण घेतलेलाच आहे.
ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यात केंद्र सरकारची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ जनतेला अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करणे पुरेसे नाही. काही राज्य सरकारांनी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवासावर कडक निर्बंध घातले, परंतु सर्वत्र त्याबाबत एकवाक्यता दिसत नाही. त्यामुळे या परिस्थितीत केंद्राने हस्तक्षेप करून ओमिक्रॉन फैलाव रोखण्यासंदर्भातील सुस्पष्ट दिशानिर्देश राज्य सरकारांना द्यावे लागतील आणि त्यांची योग्य कार्यवाही होते आहे हेही पाहावे लागेल. नागरिकांना सीकरणाचा बूस्टर डोस म्हणजे वर्धक मात्रा देण्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. मुलांच्या लसीकरणाची योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण लसीकरणाचे फसवे दावे करणार्‍यांना लसीकरण न झालेल्यांची संख्या दाखवून द्यावी लागणार आहे. मागील कोरोना फैलावावेळी केंद्रीय नेते निवडणुकांच्या प्रचारात दंग होते, त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास वेळ लागला होता. तसे यावेळी होणार नाही अशी अपेक्षा आहे. जनता पुन्हा बेफिकिर आणि बेदरकार बनलेली आहे. तिला या नव्या व्हेरियंटचे गांभीर्य समजावून द्यावे लागेल. आरोग्य यंत्रणा सुस्तावलेली आहे. तिला पुन्हा युद्धपातळीवर सुसज्ज करावे लागेल. खाटांच्या उपलब्धतेपासून प्राणवायूपर्यंतची सज्जता ठेवावी लागेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने आणि जनतेच्या संपूर्ण सहयोगानेच ओमिक्रॉनवर मात करता येऊ शकते. त्यामुळे कोरोना महामारी संपल्याचा निर्माण झालेला भ्रम दूर सारून पुन्हा त्याच्याशी दोन हात करायला सज्ज व्हावे लागेल!