उमेदवारी धुडकावत रेजिनाल्ड यांचा राजीनामा

0
14

>> पक्ष सदस्यत्वासह कॉंग्रेसची आमदारकी सोडली; तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाणार; कॉंग्रेस पक्षाकडे उरले फक्त दोन आमदार

कुडतरी मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार आणि कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सोमवारी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक जोरदार धक्का बसला आहे. रेजिनाल्ड यांनी सोमवारी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला. त्यांना चार दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती; मात्र त्यांनी ती धुडकावत आमदारकीच्या राजीनाम्यासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. रेजिनाल्ड हे मंगळवारीच तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांत कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणार्‍यांपैकी रेजिनाल्ड हे तिसरे आमदार ठरले आहेत. यापूर्वी लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ आमदार रवी नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही आमदारकीचा राजीनामा दिल्याने प्रतापसिंह राणे व दिगंबर कामत असे दोनच आमदार कॉंग्रेसकडे शिल्लक राहिले आहेत.

रेजिनाल्ड यांनी यापूर्वी कॉंग्रेस पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यावेळी त्यांची मनधरणी करून त्यांचे मन वळवण्यात कॉंग्रेसला यश आले होते. तसेच त्यावेळी त्यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष देखील बनवण्यात आले होते.

मधल्या काळात रेजिनाल्ड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेलाही ऊत आला होता; मात्र त्यावेळी रेजिनाल्ड यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना आपले प्राण गेले तरी बेहत्तर पण आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसून ते आपण आपल्या रक्तानेही लिहून देण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

मात्र, सोमवारी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन रेजिनाल्ड यांनी सर्वांनाच धक्का दिला. काल सकाळी ते पर्वरी येथे सभापतींच्या कार्यालयात आमदारकीचा राजीनामा घेऊन दाखल झाले; मात्र त्यावेळी राजेश पाटणेकर हे कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी आपला राजीनामा विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे सादर केला. त्यांनी कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आता ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आतापर्यंत पाच आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला असून, त्यात कॉंग्रेसमधील तीन, गोवा फॉरवर्डमधील एक आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपला फक्त तृणमूल कॉंग्रेस पक्षच हरवू शकतो, असे आपणाला वाटते आणि म्हणूनच आपण कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूलमध्ये प्रवेश करत आहे.

  • आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स,
    माजी आमदार, कॉंग्रेस

>> आज तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रेजिनाल्ड हे सायंकाळी कोलकात्याला रवाना झाले. ते मंगळवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. कोलकाता विमानतळावर काल रात्री दाखल झाल्यानंतर तृणमूलचे खासदार डॉ. शंतनू सेन आणि आमदार तपस चॅटर्जी यांनी त्यांचे स्वागत केले.

कॉंग्रेसला कुडतरीत नवा उमेदवार शोधावा लागणार
कॉंग्रेसने चार दिवसांपूर्वीच रेजिनाल्ड यांना कुडतरी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. कॉंग्रेसने उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली होती, त्यात त्यांचे नाव होते; मात्र आता रेजिनाल्ड यांनी पक्षाचा त्याग केलेला असल्याने पक्षाला कुडतरी मतदारसंघात नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. नव्या उमेदवाराची निवड करण्यासाठी कुडतरी कॉंग्रेस गटाची तात्काळ बैठक होणार असल्याचे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गोव्यात दाखल

केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक उच्चस्तरीय पथक काल गोव्यात दाखल झाले. या पथकामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांचा समावेश आहे. गोवा विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. हे उच्चस्तरीय पथक तीन दिवसांच्या दौर्‍यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’

>> दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया

कॉंग्रेस पक्षाने यापूर्वी सुद्धा कित्येक वादळे, पूर व त्सुनामी यांचा यशस्वीपणे सामना करीत फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आता कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे पक्ष सोडून गेले, याचा अर्थ पक्ष संपला किंवा आता आमचा पराभव होईल, असा अर्थ कुणी काढू नये. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ या संतवचनाचा दाखल देत याविषयी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.
रेजिनाल्ड यांच्यासारख्या स्वार्थी नेत्यांना धडा शिकवण्यास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्षम आहेत. २०२२ साली होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचाच विजय होईल. आपण कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी बांधील आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचाच विजय होणार
पुढील गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचाच विजय होईल. पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपण बांधील असून, त्यासाठी स्वत:ला झोकून देणार आहे, असे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले. कुडतरी मतदारसंघातील मतदार रेजिनाल्ड यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

रेजिनाल्ड कधीही पक्षात
स्थिर नव्हते : चोडणकर

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या संदर्भात काल प्रतिक्रिया देताना सांगितले की, रेजिनाल्ड हे कॉंग्रेस पक्षात कधीही स्थिर नव्हते. आम्ही त्यांना सांभाळून घेत होतो. यापूर्वी देखील त्यांनी पक्ष सोडून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढली होती, असेही चोडणकर म्हणाले.