>> कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांना इशारा
गोवा औद्योगिक विकास महामंडळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मागे घेतला नाही, तर आपण त्यांच्याविरूद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा काल उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
सेझसाठी देण्यात आलेल्या व नंतर सरकारने सेझ रद्द केल्यानंतर परत सरकारच्या ताब्यात आलेल्या जमिनींचा लिलाव करताना गोवा औद्योगिक विकास महामंडळाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी रविवारी केला होता.
या प्रकरणी चोडणकर यांनी ४८ तासांत आरोप मागे घ्यावेत; अन्यथा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्यास तयार रहावे, असे राणे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी चोडणकर यांनी केलेले आरोप हे खोटे, निराधार व दिशाभूल करणारे आहेत. कॉंग्रेस पक्षाला जर घोटाळा झाला आहे, असा संशय वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात जावे, असा सल्लाही राणेंनी दिला.