निवडणुकीपूर्वीच विधानसभेत तृणमूलचा आमदार

0
24

>> आलेमाव यांच्याकडून विधिमंडळ गट तृणमूलमध्ये विलीन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून, काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव आमदार असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी पक्षाचा विधिमंडळ गट तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीन केला. या संदर्भातील पत्र त्यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले. आलेमाव यांनी आमदारकीचा राजीनामा न देता विधिमंडळ गट विलीन केल्याने निवडणुकीपूर्वीच विधानसभेत तृणमूलचा आमदार विराजमान झाला आहे.

कोणत्याही पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या विलीनीकरणासाठी दोन तृतीयांश एवढ्या आमदारांची आवश्यकता असते. चर्चिल आलेमाव हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्याने ती आवश्यकता पूर्ण झाली आहे.

आपण पक्षाचा एकमेव आमदार असून, पक्षाच्या विधीमंडळ गटाने १०० टक्के एवढे प्रतिनिधित्व आपण करीत असल्याचे आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधिमंडळ गट तृणमूल कॉंग्रेस पक्षात विलीन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारतीय राजघटनेतील १०व्या परिशिष्टानुसार हे विलीनीकरण वैध ठरत असल्याचेही ते म्हणाले.
आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नसून, आपण आता कायदेशीरपणे तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा आमदार बनलो आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती होईल, यासाठी आपण जवळजवळ वर्षभर वाट पाहिली, असेही ते म्हणाले.
चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधिमंडळ गट तृणमूल पक्षात विलीन केल्यामुळे राज्यात निवडणुका होण्यापूर्वीच तृणमूल कॉंग्रेसला गोवा विधानसभेत एक आमदार मिळाला आहे. दरम्यान, हे विलीनीकरण वैध आहे की, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना सभापती अपात्र ठरवतील, असा सवाल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.

आलेमाव यांच्याविरोधात याचिका दाखल करणार
>> राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांची माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांची पक्षाच्या विधिमंडळ गटाची तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची कृती नियमबाह्य असून, गोवा विधानसभा सभापतींकडे आलेमाव यांच्याविरोधात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी काल पणजीत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आमदार आलेमाव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटाचे तृणमूलमध्ये विलीनीकरण करू शकत नाही. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली असून, आलेमाव यांच्या बेकायदा कृतीच्या विरोधात सभापतींकडे याचिका सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डिसोझा यांनी सांगितले.

भाजपविरोधी पक्षांना संघटित होण्याची ममता बॅनर्जींकडून हाक

>> बाणावलीतील सभेत आलेमाव यांच्यासह कन्येचा तृणमूलमध्ये प्रवेश

देशाची हानी करणार्‍या आणि धर्माधर्मामध्ये भेदभाव करणार्‍या भाजपला गोव्यातूनच नव्हे, तर भारतातून हद्दपार केले पाहिजे. गोव्यात तृणमूल कॉंग्रेसने मगोसोबत युती केली असून, भाजपला गोव्यातून हटवण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी संघटित व्हावे, अशी हाक पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बाणावली येथील सभेत दिली.

बाणावली येथील दांडो मैदानावर काल झालेल्या सभेत आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या कन्या वालंका आलेमाव यांनी तृणमूल पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या नावेली व बाणावलीतील काही कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.
गोव्यातील भाजप सरकार भ्रष्टाचारी असून, त्यांनी अनेक क्षेत्रांत भ्रष्टाचार चालविला आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्यात विरोधी पक्ष कॉंग्रेसला अपयश आले. ते आवाज न उठविता गप्प बसल्याने त्यांचाही या भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्याची शंका येते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आपली राजकीय कारकीर्द कॉंग्रेसमधून सुरू झाली होती; पण या पक्षातील वाढता भ्रष्टाचार, लाचखोरी पाहून आपण विरोध केला होता; पण तो थांबत नसल्याने आपण तो पक्ष सोडला आणि तृणमूलची स्थापना केली. या पक्षाला बंगालच्या सर्व जनतेने पाठिंबा दिला, असेही त्या म्हणाल्या.

चर्चिल आलेमाव व त्यांच्या कन्या वालंका आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या मदतीने गोव्यात नवीन सकाळ आणण्यास मदत होईल. गोवा मुक्तीच्या या हीरकमहोत्सवी वर्षात आपण स्वातंत्र्यसैनिकांना सलाम करते, असेही त्या म्हणाल्या.
भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी जनमताला जुमानत नाहीत. अशा पक्षांना या निवडणुकीत थारा देता कामा नये. गोव्याची आशा फक्त तृणमूल आहे, असे लुईझिन फालेरो यांनी सांगितले. यावेळी खासदार महुआ मोईत्रा, वालंका आलेमाव, अभिषेक बॅनर्जी यांची भाषणे झाली.

…म्हणून तृणमूलमध्ये केला प्रवेश
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना इतर पक्षांशी युती नको होती. आपण युतीसाठी वाट पाहिली; पण त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने तृणमूल पक्षात प्रवेश केला, असे आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण विषद करताना सांगितले.

गोव्यात सर्वसामान्य जनतेला, मजूर, तरुण, महिला या सर्वांना न्याय देण्याचे काम तृणमूल कॉंग्रेसचे सरकार करेल, याची आपण ग्वाही देते. गोवा हा छोटा; पण सुंदर प्रदेश आहे. त्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचे काम तृणमूलचे सरकार करेल.

  • ममता बॅनर्जी,
    अध्यक्ष, तृणमूल कॉंग्रेस.