आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी होऊ नये, यासाठीच मगो पक्षाने ‘एकला चलो रे’ हा आपला निर्णय मागे घेऊन तृणमूल कॉंग्रेसबरोबर युती केल्याचे काल मगो पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
विरोधी पक्षांची मते फुटून त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला होऊ नये, असे ज्या ज्या कुणाला वाटत आहे, त्या विरोधी पक्षांनी तृणमूल कॉंग्रेस व मगोच्या युतीत सहभागी व्हावे, असे आवाहन मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले.
राज्यातील जनतेला चांगले प्रशासन देणे हाच या युतीचा उद्देश आहे आणि त्यासाठी सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याची आवश्यकता आहे. ज्या कुणाला आमच्या युतीत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी पुढे यावे, असेही ढवळीकर म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष निर्णय घेण्यास विलंब लावते. या विलंबामुळे सत्ताधार्यांना विजय मिळण्यास मदत होते. आणि म्हणूनच आम्ही कॉंग्रेसचा नाद सोडून तृणमूल कॉंग्रेसबरोबर युती केल्याचे मत ढवळीकर यांनी व्यक्त केले.