नोकरभरती घोटाळा ७० कोटींचा

0
27

>> आमदार बाबूश मोन्सेरात यांचा पुनरुच्चार

>> मंत्री पाऊसकर यांनी आरोप फेटाळले

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर्‍यांचा घोटाळा हा तब्बल ७० कोटी रुपयांचा आहे, असा जोरदार आरोप काल भाजपचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी केला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शनिवारी बाबुश मोन्सेर्रात यांनी केला होता. याच घोटाळ्याचा काल पुनरुच्चार करताना ते म्हणाले की हा घोटाळा हा तब्बल ७० कोटी रुपयांचा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून ही नोकरभरती रद्द करावी, अशी मागणीही बाबूश मोन्सेर्रात यांनी रविवारी केली.

दरम्यान, नोकरीसाठी एका एका उमेदवाराकडून प्रत्येकी ३५ लाख रु. घेण्यात आल्याचा आरोप करतानाच ह्या लिलावात ज्यांनी सर्वांत जास्त पैसे दिले त्यांना लेखी परीक्षेत सर्वांत जास्त गुण देण्यात आल्याचा आरोपही मोन्सेर्रात यांनी केला आहे.

घोटाळ्याचा पर्दाफाश करणार
पाऊसकर यांनी केलेल्या ह्या महाघोटाळ्याचा आपण पूर्णपणे पर्दाफाश करणार असल्याचे सांगतानाच अत्यंत हुशार अशा उमेदवारांना ही पदे भरताना डावलण्यात आले आहे. जर उद्या डावलण्यात आलेल्या उमेदवारांनी जीवाचे काही बरे वाईट करून घेतले तर त्याला पाऊसकर हेच जबाबदार राहणार असल्याचे मोन्सेर्रात यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने ह्या प्रकरणाची
सू-मोटो दखल घ्यावी

ही नोकरभरती रद्द करून नव्याने उमेदवारांची निवड करेपर्यंत कॉंग्रेस पक्ष गप्प बसणार नसल्याचे काल पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी स्पष्ट केले. नोकर भरती घोटाळा हा भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून चालूच असून आता कॉंग्रेस पक्ष गप्प बसणार नसल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळ्याची सू-मोटो दखल घ्यावी, अशी मागणीही पणजीकर यांनी केली.

पाऊसकर यांनी आरोप फेटाळले
दरम्यान, या प्रकरणी सारवासारव करताना मंत्री दीपक पाऊसकर यांनी बाबूश मोन्सेर्रात यांनी काही उमेदवारांच्या नावांची शिफारस केली होती. पण परीक्षा आणि निकाल यामध्ये आपण हस्तक्षेप केला नसल्याचे सांगताना आपणावरील आरोप फेटाळले. आरोप करणार्‍यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही त्यांनी मोन्सेर्रात यांना दिले.

भाजपचे सरकार हे
घोटाळेबाज ः कांदोळकर

तृणमूल कॉंग्रेसचे नेते किरण कांदोळकर यांनी, अगोदरपासूनच भाजपचे सरकार हे घोटाळेबाजांचे सरकार आहे असे म्हणत होतो. ज्यावेळी सरकारमधीलच एक आमदार आपल्याच मंत्र्यावर आरोप करत आहे म्हणजेच खरोखरच हा घोटाळा झालेला आहे. प्रत्येक पदवीसाठी पैसे घेतले जातात. पोलीस हवालदाराच्या जागेसाठी सात ते साडेसात लाख रुपये घेतात. इथून सुरूवात आहे. हे भस्मासुराचे सरकार आहे. त्याला जनताच उत्तर देईल असे सांगितले.

काल गोव्यात दाखल झालेल्या दाबोळी विमानतळावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे स्वागत करण्यासाठी आल्यानंतर कांदोळकर बोलत होते.
दरम्यान, काल उघड झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळ्यासंबंधी आणखी माहिती आता हळूहळू उघड होऊ लागलेली आहे.

काल बाबूश मोन्सेर्रात यांनी ह्या घोटाळ्यासंबंधी आणखी माहिती देताना सांगितले की, एका वरिष्ठ मंत्र्याने आपल्या समर्थकांसाठी १० पदे राखून ठेवण्याची विनंती केली होती.

या मंत्र्याला पाऊसकर यांनी, ह्या पदांसाठी परीक्षा देणार्‍या त्यांच्या समर्थकांच्या मुलांना लेखी परीक्षेचे पेपर रिक्त ठेवा. त्यावर लिहून त्यांना चांगले गुण मिळतील याकडे आम्ही लक्ष देणार असल्याचे सांगण्यास सांगितले. त्यानुसार ह्या उमेदवारांनी आपले पेपर रिक्त ठेवले. मात्र ते तिन्ही उमेदवार या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने त्या वरिष्ठ मंत्र्याला धक्का बसल्याचे मोन्सेर्रात यांनी सांगितले.

पाऊसकर-लोबो यांच्यात पंचतारांकीत हॉटेलात भांडण
बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी केलेल्या ह्या नोकर्‍यांच्या लिलावाच्या प्रश्‍नावरून विवांता ह्या पंचतारांकीत हॉटेलात मंत्री पाऊसकर व त्यांचे एक सहकारी असलेले बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचेही काल मोन्सेर्रात यांनी सांगितले. पाऊसकर यांनी ही पदे भरताना खुद्द आपल्या सावर्डे मतदारसंघांतील हुशार विद्यार्थ्यांवरही अन्याय केल्याची माहिती हाती आली आहे असे मोन्सेर्रात यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे मौन ः कॉंग्रेस
सार्वजनिक बांधकाम खात्यात तब्बल ७० कोटी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाल्याचा आरोप खुद्द भाजपमधील एक आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी केलेला असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मात्र अजून मुग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्‍न काल कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी केला. एवढा मोठा नोकरभरती घोटाळा झालेला असताना मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसणार आहेत काय, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.

दिगंबर कामत
यांचीही टीका

ह्या नोकरभरतीत वशिलेबाजी करता यावी यासाठीच कर्मचारी निवड भरतीद्वारे ही निवड करण्यात आली नसल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला.