विवाह संस्काराचे महत्त्व योगसाधना – ५३० योगमार्ग – राजयोग अंतरंग योग – ११५

0
68
  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपले जीवन म्हणजे रथ आहे. जशी रथाला अथवा बैलगाडीला दोन चाके असतात तसेच जीवनरथाला दोन चाकं आहेत- स्त्री व पुरुष. या दोन्ही वाहनांमध्ये दोन्ही चाकं तेवढीच महत्त्वाची आहेत.

भगवंताने रचलेली सृष्टी, त्याचे विश्‍व विस्तृत आहे. फार मोठे आहे. अत्यंत गूढ आहे. ते समजण्यासाठी, त्याचे आकलन होण्यासाठी भारतीय ऋषी-महर्षी, संत-महापुरुषांसारखी प्रगल्भ बुद्धी पाहिजे. त्याचबरोबर शास्त्राभ्यास, चर्चा, सुसंवाद, तपश्‍चर्या हवी. आपल्यासारख्या सामान्यांना हे उच्च तत्त्वज्ञान लगेच समजणार नाही. पण आपण भाग्यवान आहोत. भगवंताची आपल्या सर्व मुलांवर सारखीच कृपादृष्टी असते. म्हणून भारतात विविध शास्त्रे लिखित रूपात उपलब्ध आहेत. गरज आहे ती प्रामाणिक इच्छा व त्याप्रमाणे कर्म करण्याची!
या सर्व शास्त्रांमध्ये एक अत्यंत उपयुक्त शास्त्र म्हणजे योगशास्त्र. पण त्या शास्त्राचा सखोल अभ्यास अपेक्षित आहे. तरच सृष्टीच्या रहस्याचा थोडा थोडा उलगडा होईल.
आपले जीवन म्हणजे रथ आहे. जशी रथाला अथवा बैलगाडीला दोन चाके असतात तसेच जीवनरथाला दोन चाकं आहेत- स्त्री व पुरुष. या दोन्ही वाहनांमध्ये दोन्ही चाकं तेवढीच महत्त्वाची आहेत, त्यामुळे एकाच मापाची – एक लहान व दुसरे मोठे असून चालत नाही.

आता तर ही वाहने भूतकाळात गेली. हल्लीचे वाहन म्हणजे दुचाकी- स्कूटर अथवा मोटारसायकल – एक चाक पुढे तर दुसरे मागे. हीदेखील एकाच मापाची हवीत. तसेच त्यात हवासुद्धा व्यवस्थित भरलेली हवी. दोघांची कामे थोडी वेगळी- मागचे चाक पॉवर म्हणजे शक्ती देते व पुढील चाक दिशा देते. ब्रेक दोन्ही चाकांना सारखेच हवेत.
तसेच आपले मानवी जीवन- स्त्री-पुरुष; पत्नी-पती ही दोन चाके.

प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळे गुण दिलेले आहेत.

  • स्त्री – स्नेह, माया, ममता, वात्सल्य, दया, लज्जा…
  • पुरुष – विवेक, पौरुष, कर्तृत्व, निर्भयता, ज्ञान…
    भगवंताची इच्छा आहे की हे दोन्ही तर्‍हेचे गुण एकत्रित होऊन एक उत्कृष्ट असा मानव बनावा. हा मानव स्वतःचा जीवनविकास तर साधेलच पण त्याचबरोबर विश्‍व व त्यातील सर्व घटकांचा प्रेमाने, मायेने सांभाळ करील. गरज लागेल तेव्हा अन्यायाविरुद्ध लढेल.
    शास्त्रकार म्हणतात – ‘‘अर्धाङ्गे पार्वती दधौ’’
  • अभिप्रेत अर्थ म्हणजे नरत्व व नारीत्व एकमेकांना चिकटून बसले. म्हणून ‘अर्धनारी-नटेश्‍वर’
  • भगवान शिवाने आपले अर्धे अंग पार्वतीला दिले. दार्शनिक दृष्टीने विचार केला तर लक्षात येते की स्त्री-पुरुषाचे गुण एकत्र आले की पार्वती-परमेश्‍वर बनतात. त्यामुळे असा परमेश्‍वर फक्त कर्तृत्ववान नाही तर तो कृपाळू, दयाळू, मायाळू आहे. तसाच वत्सल व प्रेमळही आहे. त्याचप्रमाणे पौरुष, निर्भयता, विवेकही आहे. हाच उमामहेश्‍वर शंकर – * सत्यं * शिवं * सुंदरम्.
    आपल्या पुराणामध्ये तत्त्ववेत्ते सांगतात की नररूप शिव आहे तर नारीरूप उमा आहे. हे दोघेही विश्‍वाचे कारणरूप आहेत.
  • उपनिषद म्हणूनच म्हणते –
    ‘‘रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्यै नमो नमः|
    रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्यै मो नमः|
    रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मै तस्यै नमो नमः|’’
  • इथे त्रिदेव ब्रह्मा-विष्णू-महेश व त्यांच्या भार्या – सरस्वती-लक्ष्मी-पार्वती अभिप्रेत आहेत.
  • रुद्र सूर्य तर उमा त्याची प्रभा.
  • रुद्र फूल तर उमा त्याचा सुगंध.
  • रुद्र यज्ञ तर उमा त्याची वेदी.
    हे सर्व तत्त्वज्ञान फक्त वाचून, माहीत असून उपयोगी नाही. ते स्वतःच्या जीवनात उतरायला हवे. ही गोष्ट सोपी करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी विवाहसंस्था ही एक पवित्र अशी संस्था निर्माण केली.

अग्नीच्या व समाजाच्या साक्षीने हा सुंदर, उत्तुंग संस्कार मोठ्या आनंदाने पार पाडला जातो. त्यानंतरच पती-पत्नींचा गृहस्थाश्रम सुरू होतो. हे सर्व मुद्दे समजून जर सर्वांनी संसार केला तर दाम्पत्याच्याच नव्हे तर कुटुंबातही सलोखा निर्माण होईल. गैरसमज, भांडणे, घटस्फोट… यांना जीवनात जागाच उरणार नाही. हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा स्त्री-पुरुष एकमेकांचे सद्गुण बघतील. दुर्गुण दाखवतील पण एका हितचिंतकाच्या भूमिकेने ते दूर करण्यासाठी मार्गदर्शन व प्रेमाने प्रयत्न करतील. तसेच मतभेद जरी असले तरी त्याचे परिवर्तन मनभेदात करणार नाहीत.

स्वर्ग काही आपल्यापासून खूप दूर परमधामात, आकाशात किंवा देवांच्या राज्यात नाही. तो आपल्या आसपासच आहे. फक्त तो कसा अनुभवावा याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे. एकमेकांच्या सहकार्याने जीवन जगलो तर सुखशांती मिळेल व स्वर्ग निर्माण होईल.

तसाच नरकसुद्धा भूमीखाली पाताळात किंवा दूर नाही. तोही आपल्या सभोवतीच आहे. स्वार्थी व आत्मकेंद्री वृत्ती वाढली की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू व अहंकार वाढतात. त्यामुळे बुद्धिनाश होतो. सर्वांचे अधःपतन होते.

विश्‍वाकडे नजर फिरवली, थोडा इतिहासाचा अभ्यास केला की लक्षात येईल की अनेक श्रेष्ठ पुरुषांच्या जीवनात एक स्त्री आहे जिच्यामुळे त्या पुरुषाची कर्तृत्वशक्ती वाढते. मग ती स्त्री आई, बहीण, पत्नी… कुणीही असो. त्याप्रमाणेच स्त्रीला समर्थ पुरुषांचीही साथ लाभली आहे. मग तो पुरुष पिता, भाऊ, पुत्र असेल.
उदाहरणे अनेक आहेत…

  • ध्रुव, प्रल्हाद, राम, शिवाजी
  • अहिल्याबाई होळकर, जिजाबाई, झाशीची राणी.
    म्हणूनच संस्कार वर्गात या थोर व्यक्तींच्या गोष्टी नियमित करणे अत्यावश्यक आहे. बालमनावर त्याचा परिणाम होतो. त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. त्यांना देशभक्ती, संस्कृतीप्रेम… इत्यादी अनेक विषयांवर बाळकडू रूपाने ज्ञान मिळते. असे नाही झाले तर ते अज्ञानी राहतात. अथवा विपरीत ज्ञानाचे शिकार होतात. अन्य संस्कृतींचा त्यांच्यावर परिणाम होतो.

चौफेर नजर फिरवली की लक्षात येते की आपल्या इथे भारतीय संस्कृतीबद्दल शास्त्रशुद्ध ज्ञान अगदी थोड्याच व्यक्तींना आहे. आपल्यापैकी जे कुणी आध्यात्मिक संस्थांच्या नियमित संपर्कात आहेत त्यांना थोडेफार ज्ञान आहे.

श्रीमद्भगवद्गीतेच्या गुणत्रयविभाग (१३वा अध्याय) मध्ये प्रकृती-पुरुष या संबंधात एक श्लोक आहे –

  • प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि |
    विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥
  • प्रकृती व पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज. आणि राग-द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत, असे समज. सांख्ययोगी तत्त्ववेत्तेसुद्धा प्रकृती व पुरुष ही सृष्टीच्या मुळात असलेली दोन तत्त्वे मानतात. एका तत्त्वाशिवाय दुसरे पांगळे आहे.
    पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात समजावतात…
    ‘परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम् ’-
    शिव व पार्वती ही दोघेही एकमेकांना चिकटून आहेत. एकमेकांना आलिंगन दिले आहे. एकाच भगवंताचे रूप आहे. पण त्यात नरगुण व नारीगुण यांचे मिश्रण झालेले आहे. त्याचे अर्धनारीनटेश्वराच्या रूपात चित्रण आहे. पुराणे शिवपार्वतीचा रतिसंभव अनादिकालापासून अनंतकाळापर्यंतचा दाखवतात. खरे पाहता त्याचा अर्थ असा आहे की स्त्री-पुरुषाचे गुण परस्पराश्लिष्ट आहेत. भगवंताचे पौरुष कधीही कारुण्य सोडून राहत नाही. पूर्ण जीवनासाठी पौरुषाबरोबर सतत कारुण्य असले पाहिजे. कर्तृत्वासोबत वत्सलता असली पाहिजे. भगवंतामध्ये हे गुण चिकटून बसलेले आहेत. आलिंगन देऊन बसले आहेत.

भारतीय इतिहासात विविध उदाहरणे आहेत- उदा. सती सावित्री, रणचंडी लक्ष्मीबाई, सती जाणारी राणी पद्मिनी… या सर्व चरित्रांचे या संदर्भात संशोधन आवश्यक आहे.
योगसाधक या गूढ व सुंदर विषयावर अवश्य चिंतन करतील याची खात्री आहे. तसे घडले तर विविध प्रश्‍नांची उत्तरे व अनेक समस्यांचे उपाय आपोआपच सापडतील.
(संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे ‘संस्कृती पूजन’)