राज्यात ओमिक्रॉनचे ५ संशयित

0
17

>> गोव्यात आलेल्या ५ विदेशींना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचा संशय

एकीकडे देशातील अनेक राज्यांत ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत असताना आता राज्यात देखील या विषाणूने प्रवेश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका शिपिंग जहाजातून गोव्यात आलेल्या ५ विदेशी नागरिकांना कोविडच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याचा संशय असून, या पाचही जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली.

देशभरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यानंतर आता राज्यात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या जहाजावरील पाचही विदेशी नागरिकांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सदर खनिजवाहू जहाज ३१ ऑक्टोबरला केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) येथून रवाना झाले होते. त्यानंतर हे जहाज १८ नोव्हेंबरला गोव्यात दाखल झाले. या पाचपैकी तिघे जण रशिया आणि दोघे जॉर्जिया येथील रहिवासी आहेत. पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल बुधवार किंवा गुरुवारी प्राप्त होण्याची शक्यता आहे. या जहाजावरील २१ जणांची कोविड-१९ साठी चाचणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कृती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात सतर्कता बाळगली जात आहे. राज्यात दाखल होणार्‍या प्रवाशांना गोवा विमानतळावर कोविड-१९ तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

घाबरू नका, नियमावलीचे पालन करा : आरोग्यमंत्री
एका जहाजातील ५ जण ओमिक्रॉनचे संशयित रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्या पाच जणांना आरोग्य खात्याने निरीक्षणाखाली ठेवले आहे. राज्यातील नागरिकांनी या प्रकारामुळे घाबरून जाऊ नये. कोविडपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले आहे.