आफ्रिकेत कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट

0
27

सध्या भारतात कोरोनाचे नवे बाधित सापडण्याचे प्रमाण कमी होत असताना दिसून येत आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट (प्रकार) सापडल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे आफ्रिकेत २२ जण बाधित झाले ७ आहेत. यामुळे आफ्रिकेतील नागरिक भयभीत झाले आहेत. खासगी लॅबना कोरोनाच्या या नव्या प्रकाराने बाधित रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा नवा व्हेरिअंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजने (एनआयसीडी) दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिअंट अधिक संक्रमक असू शकतो. या नव्या व्हेरिअंटला ‘बी.१.१.५२९’ हे नाव देण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांना सरकारने तातडीने जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा हा नवा प्रकार किती घातक, संक्रमक आहेहे त्यामुळे कळून येईल.

एनआयसीडीचे कार्यवाहक कार्यकारी संचालक प्रा. एड्रियन पुरेन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिअंट मिळाला आहे मात्र त्याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. आमचे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ या विषयावर सतत काम करत आहेत. या प्रकाराचा उगम कुठून झाला हे शोधण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरू असून ते लवकरच याबाबत शोध घेतील. आम्ही लोकांना सतत सल्ला आणि इशार्‍यांद्वारे या कोरोनाचा संसर्ग टाळण्यास सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पब्लिक हेल्थ सर्व्हिलन्स अँड रिस्पॉन्सचे प्रमुख डॉ. मिशेल ग्रूम यांनी या प्रकारातील पॉझिटिव्ह लोकांची संख्या आणि संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम्ही देशभरातील एनआयसीडीसह सर्व राज्यांच्या आरोग्य प्रशासनाला सतर्क केले आहे.

गोव्यासह १३ राज्यांना
सतर्कतेचा इशारा

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीने केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी १३ राज्यांना पत्र लिहिले असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पत्रात घटत्या कोरोना चाचणीच्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. पत्र पाठवलेल्या राज्यांमध्ये गोव्यासह पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, केरळ, लडाख, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झाले होते. पण आता रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या ९ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कोरोना मृत्यूदर १२१ टक्क्‌यांनी वाढला आहे.
देशभरात १५ नोव्हेंबरला १९७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर २३ नोव्हेंबरला ही संख्या ४३७ झाली आहे.

देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली दिसून आली आहे मात्र मृतांचा आकडा वाढलेला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९,११९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ३९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १०,२६४ जण कोरोनावर मात केली. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आता एकूण १,०९,९४० सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या ५३९ दिवसांनंतर सर्वात कमी आहे. बुधवारी देशात कोरोनाचे ९,२८३ नवीन रुग्ण आढळून आले होते तर ४३७ लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी १०,९४९ रुग्णांनी करोनावर मात केली होती.