गोव्यात राजकीय ‘मॅरेथॉन’

0
40
  • प्रमोद ठाकूर

गोवा विधानसभेची निवडणूक नवीन वर्षात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकीय नेते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेते उमेदवारी मिळणार्‍या पक्षात प्रवेश करू लागले आहेत.

गोवा विधानसभेची निवडणूक नवीन वर्षात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकीय नेते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय नेत्यांच्या पक्षांतराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेते उमेदवारी मिळणार्‍या पक्षात प्रवेश करू लागले आहेत. गोवा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख प्रत्यक्ष जाहीर होईपर्यंत राजकीय पातळीवर कोणकोणत्या घडामोडी घडतील, हे सांगता येणे कठीण आहे. पण आगामी विधानसभेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी एक आव्हान आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही निवडणूक मोठे आव्हान बनणार आहे, अशी चिन्हे एकूण रागरंग पाहता दिसत आहेत. केंद्रीय पातळीवर भाजपचे सरकार असल्याने भाजपला सत्ता आपल्याकडे टिकवून ठेवायची आहे. त्यादृष्टीने भाजपकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. भाजपचे काही नेते उघडपणे उमेदवारीबाबत मतप्रदर्शनही करीत आहेत, तर काही भाजप नेत्यांच्या गुप्तपणे राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आज भाजपमध्ये असलेले काही नेते निवडणूक जाहीर होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर भाजपमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भाजपच्या विद्यमान चार ते पाच आमदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी त्यांच्या पत्नी डिलायला हिला शिवोली मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री लोबो यांच्याकडून याबाबत जाहीर वक्तव्य केले जात आहे. लोबो सध्या भाजपकडून पत्नीच्या उमेदवारीबाबत स्पष्ट आश्‍वासन न मिळाल्याने नाराज बनले आहेत. बार्देश तालुक्यातील कलंगुट, शिवोली, म्हापसा या मतदारसंघांत लोबो यांचे वर्चस्व आहे. मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्यास भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी ठेवली आहे.
मायकल लोबो हे कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, कॉँग्रेसच्या कलंगुट मतदारसंघातील प्रमुख नेत्यांनी लोबो यांच्या कॉँग्रेस प्रवेशाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते पी. चिदंबरम् यांना कलंगुट मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करावी लागली. तरीही विधानसभा निवडणुकीला आणखीन बरेच दिवस असल्याने राजकारणात काहीही घडू शकते.

दुसरीकडे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे नाराज बनलेले आहेत. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून सहभाग घेतला नाही. केंद्रीय नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आरोग्यमंत्री राणे यांची नाराजी थोडी दूर झाली असावी. राणे वाळपई मतदारसंघात कार्यरत आहेत. राज्यात निवडणुकीच्या वेळी उलथापालथ झाल्यास ते कुठल्या बाजूने राहतील हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे.

पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात आपली नाराजी उघडपणे दाखवत नाहीत. मिरामार समुद्रकिनार्‍यावर उद्घाटन सोहळ्याला आमदार मोन्सेरात अनुपस्थित होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. आपण विधानसभेची निवडणूक लढविण्यास ठाम असल्याचे उत्पल यांनी जाहीर केले आहे. उत्पल यानी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही निवडणुकीच्या विषयावर चर्चा करून उमेदवारीवर आपला दावा केला आहे. उत्पल यांच्या वाढदिनी त्यांच्या समर्थकांनी श्रीमहालक्ष्मी मंदिरात एकत्र येऊन त्यांना निवडणूक लढविण्यास पाठिंबा दिला आहे.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याकडून त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याने माजी आमदार सुभाष फळदेसाई यांचे समर्थक नाराज बनले आहेत. तसेच, सांगेतील भाजपचे अन्य काही इच्छुक उमेदवारही नाराज बनले आहेत. भाजपचे नेते निवडणुकीपूर्वी वेगवेगळी वक्तव्ये करीत असले तरी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होताच सर्व मंत्री व नेते एकत्र येऊन भाजपच्या विजयासाठी मदत करतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली आहे.

म.गो.नेही विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली आहे. म.गो.कडून निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे केले जाणार आहेत. म.गो.चे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आमदार सुदिन ढवळीकर मडकई मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. म.गो.चे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे प्रियोळ मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. म.गो.च्या मांद्रे, पेडणे मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे.

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्‍चित केले आहे. भाजपकडून धोका असल्याने आमदार खंवटे यांनी कॉंग्रेस पक्षाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आमदार खंवटे यांच्या समर्थकांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खंवटे यांच्यामुळे पर्वरी मतदारसंघात कॉँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत होणार आहे. आमदार खंवटे यांनाही आगामी निवडणुकीत याचा फायदा होणार आहे.

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याप्रमाणे गावकर यांच्या समर्थकांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गावकर यांनी काही महिन्यांपूर्वी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तथापि, आता कॉंग्रेस पक्षाऐवजी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्‍चित केले आहे.

राज्यात भाजप-म.गो. निवडणूक आघाडीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांकडून दोन्ही पक्षांच्या आघाडीबाबत भाजपचे निवडणूक प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करीत असल्याची माहिती दिली जात आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याने आघाडीसाठी प्रयत्न केला जात आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये उमेदवारीबाबत एकवाक्यता नाही. काही मतदारसंघांत उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त दावेदार आहेत. काही इच्छुक प्रचारकार्यात गुंतलेले आहेत. मांद्रे मतदारसंघात आमदार दयानंद सोपटे आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आमदार सोपटे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचारकार्याला सुरुवात केली आहे.

काणकोण मतदारसंघात उमेदवारीसाठी अनेक दावेदार आहेत. स्थानिक आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. भाजपचे पदाधिकारी रमेश तवडकर यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. आमदार मनोहर आजगावकर यांना पेडणे मतदारसंघात विरोधक आणि पक्षातील नेत्यांच्या कडव्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच भाजपमधील एका स्थानिक नेत्यानेही उमेदवारीसाठी दावा केला आहे.

फोंडा मतदारसंघातही निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान आमदार रवी नाईक कोणत्या पक्षातून निवडणूक रिंगणात उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मगोप, भाजप, आम आदमी, तृणमूल कॉँग्रेस या पक्षांकडून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे.

प्रियोळ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, या मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा मंत्री गोविंद गावडे हे कोणती भूमिका घेतात याबाबत लोकांत संभ्रम आहे. स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री गावडे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे. गावडे यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन चर्चा केली होती. तथापि, गावडे यांच्या भाजप प्रवेशाला अजूनपर्यंत मान्यता मिळालेली नाही. मंत्री गावडे यांची बदनामी करणारी पोस्टर्स सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने ते नाराज बनले आहेत.

भाजप-मगोप, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष यांच्यात निवडणूक आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मतदारसंघांच्या वाटपामध्ये एकमत झाल्यास निवडणूक आघाडी होऊ शकते. निवडणूक आघाडी न झाल्यास भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने निवडणूक आघाडीसाठी १० जागा मागितल्या आहेत. कॉँग्रेस पक्षाने या आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले आहे.

राज्यात आम आदमी पार्टीचा प्रचार जोमाने सुरू झाला आहे. इतर पक्षांतील नाराज बनलेल्या नेत्यांना आम आदमी पार्टीत प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. आपचे प्रमुख नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून समाजातील विविध घटकांतील लोकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात येत आहेत. आम आदमी पार्टीची ‘भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिश्‍चन समाजाचा उपमुख्यमंत्री’ ही घोषणा चर्चेचा विषय बनलेली आहे. विविध राजकीय पक्षांकडून या घोषणेच्या विरोधात मत व्यक्त केले जात आहे. राज्यातील टॅक्सी व्यावसायिक, मोटरसायकल पायलट यांच्यासाठी खास महामंडळ स्थापन करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. सत्तरी तालुक्यातील नागरिकांना भेडसावणार्‍या जमीन मालकीच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालण्याचे आश्‍वासनही केजरीवाल यांनी दिले आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टीने कॉँग्रेस पक्षाशी आघाडी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गोवा फॉरवर्डचे तीनही आमदार कॉँग्रेसप्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा फॉरवर्डच्या पेडणे मतदारसंघातील एका उमेदवाराने कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

तृणमूल कॉंग्रेस हा नव्याने गोव्यात दाखल झालेला राष्ट्रीय पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉँग्रेस पक्षाच्या विस्ताराचे काम केले जात आहे. इतर पक्षांतील काही नाराज नेते तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.

‘रिव्होल्युशनरी गोवन’ ही संघटना विधानसभा निवडणूक रिंगणार उतरणार आहे. या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ती गोवा सुराज पार्टीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणार आहे. या संघटनेने राजकीय पक्ष म्हणून नोंदणीसाठी अर्ज सादर केलेला आहे.

साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न चालविले आहेत.

वाळपई आणि पर्ये या दोन्ही मतदारसंघांवर मंत्री विश्‍वजित राणे यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम राखण्यासाठी राणे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. विरोधकांनी या दोन्ही मतदारसंघांत आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.
भाजपचे सांत आंद्रे मतदारसंघातील आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यासमोर भाजपचे नेते रामराव वाघ यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात भाजपची उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. रामराव वाघ यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. वास्को मतदारसंघात राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

सासष्टी तालुक्यातील सर्वच मतदारसंघांत भाजपला मोठे आव्हान आहे. कॉँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सासष्टी तालुक्यातील आमदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. काहींनी कॉँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. घोडामैदान जवळच असल्याने येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होणारच आहे.