मगो पक्षाला भाजपने १२ जागा सोडल्यास मगो पक्ष भाजपबरोबर युती करण्यास तयार आहे, असे आपण म्हटलेच नव्हते. युतीसंबंधीचा निर्णय मगो पक्षाची कार्यकारिणीच घेणार आहे. प्रसारमाध्यमांनी आपण न म्हटलेली गोष्ट प्रसिद्ध केल्याचा आरोप मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल केला.
मगो पक्ष भाजपबरोबर युती करण्यास तयार असून, भाजपने मगोसाठी १२ जागा सोडायला हव्यात, अशी मगो पक्षाची अट असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी रविवारी म्हटले होते. मात्र, काल त्यांनी आपण तसे म्हटलेच नसल्याचे पत्रकारांसमोर सांगितले.
भाजपबरोबर युती करून मगो पक्षाने तीन वेळा आत्महत्या केलेली आहे. सरकार स्थापन केल्यानंतर मगो पक्षाच्या आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचे काम भाजप सरकारने दोन वेळा केले असल्याचेही ढवळीकर म्हणाले.
मगो पक्षाने यापूर्वीच १२ मतदारसंघांत आपले काम जोमाने सुरू केलेले असून, या १२ मतदारसंघापैकी बहुतेक मतदारसंघांत पक्षाचे उमेदवारही निश्चित झाले असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.