नर्मदेऽऽ हर हरऽऽ

0
94
  • गजानन यशवंत देसाई

श्रीरामाच्या बोलण्यात मला यत्किंचितही अहंपणाची भावना दिसत नव्हती. तीन महिने तीन हजार किलोमीटरचा अतिशय खडतर पायी प्रवास करून आलेला हा माणूस सहज म्हणत होता, ‘‘खडतर वगैरे काही नाही, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला कशाचीही कमतरता पडत नाही.’’

साखळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ त्याचं दुकान. अगदी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर. त्याची आणि माझी ओळख तशी जुनी नाहीच. पाच-सहा वर्षांपासूनची असेल. पूर्वी ते एक पेट्रोल पंपाचे स्थान होते. कालांतराने त्या तिथे एक टपरीवजा दुकान आले, आणि त्या दुकानात तो लिंबू सरबत, कोकम सरबत असंच काहीबाही विकायचा.

खरं म्हणजे त्यावेळी त्याचं नावसुद्धा मला माहीत नव्हतं. विठ्ठलापुरातल्या पित्रे किंवा बाक्रेपैकी कोणीतरी असावा, एवढीच ओळख. कधीतरी लिंबू सरबत घ्यायला तिथं थांबायचं, कधीतरी कोकम सरबत घ्यायला, तर कधीतरी आंबे फणस.

पण पावसाळा सुरू झाला की त्याच्या दुकानासमोर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, फळझाडं विकायला असायची. त्यावेळी मात्र मी न चुकता तिथं जायचो. हा माणूस हसतमुखाने समोर यायचा आणि त्या झाडाबद्दल माहिती द्यायचा. या सर्व गोष्टींपेक्षा त्याची एक लकब मात्र मला फार आवडायची. सरबताची ऑर्डर दिली की सरबत तयार करताना आपल्याच तंद्रीत एखाद्या अभंगाची किंवा मराठी गाण्याची ओळ गुणगुणायचा. अगदी सुरेख आवाजात नसेल, सुरेख स्वरात नसेल, पण त्याचं ते आपल्याच तंद्रीत राहणं किंवा क्षणभर जगाला विसरणं मला अतिशय आवडायचं. ताल-स्वराची जाण असेल-नसेल, पण त्याला असलेली संगीताची आवड त्याच्या या छोट्याशा कृतीतून दिसत होती. पण हा आजचा विषय नाही.

‘बिल्वदल’ संस्थेशी संबंध आल्यानंतर संस्थेच्या सचिवा करुणा बाक्रे यांचा परिचय झाला. पूर्वी फक्त तोंडओळख होती. त्यांचा मुलगा छान हार्मोनिअम वाजवतो तेही रवींद्र भवनच्या एका कार्यक्रमामुळे लक्षात आलं होतं. आणि तिथंच लक्षात आलं की आज ज्या माणसाबद्दल लेखन-प्रपंच करीत आहे तो श्रीराम बाक्रे हे करुणा बाक्रे यांचे पती आहेत. अतिशय साधा असलेला हा माणूस. करुणा बाक्रेनी ज्यावेळी आपलं नोटरीचं कार्यालय तिथे प्रस्थापित केलं, त्यावेळी सुरुवातीच्या काळात त्यांना मदत करायचा. कुठले तरी पेपर बघा, त्यावरच्या सह्या बघा, शिक्के बघा… असंच काहीतरी. त्यात असा अभिनिवेश वगैरे होता असं नाही, पण सुरुवाती सुरुवातीला हे असायचं. त्यावेळी या माणसाची शैक्षणिक पात्रता काय असावी? असा प्रश्‍न माझ्या मनात तरळून गेला होता. पण मनातला प्रश्‍न मनातच राहिला. मध्यंतरी कधीतरी श्रीराम बाक्रे यांच्या दुकानासमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसून ‘मोझिटो’ प्या किंवा दुसरा कसला तरी शेक प्या, एखादा सामोसा वगैरे चालायचं.

अशा वस्तू ज्या बाजारात सहज मिळणार्‍या नाहीत- फळं, कंदं वगैरे- ती श्रीराम बाक्रे यांच्या दुकानात हमखास मिळतात म्हणून साहजिकच त्या बाजूला नजर भिरभिरते. मग ‘मोझिटो’ किंवा शेक करताना गुणगुणला गेलेला एखादा अभंग.

२०१९ च्या ऑक्टोबरमध्ये श्रीराम बाक्रे यांचे दुकान बंद असलेले माझ्या लक्षात आले. नोव्हेंबरमध्ये सुट्टीत ‘मोझिटो’ पिण्याची लहर आली आणि पाय त्या दिशेने वळले. पण दुकान अजूनही बंद होते. जवळजवळ दोन-अडीच महिने. मला वाटलं दुकान बंद केलं असावं. एकदा वाटलं करुणांना फोन करून विचारावे. पण म्हटलं कशाला दुसर्‍याच्या खाजगी जीवनात मुद्दाम डोकवावं? यानंतर तो विषयच बाजूला पडला. साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीत श्रीराम बाक्रे यांचे दुकान उघडे असलेले मला गाडीतूनच दिसले आणि बाहेर खुर्चीत बसलेला श्रीराम. एकदम कृश झालेला, गालफडे बसलेली, डोळे आत गेलेले… माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा. श्रीराम बाक्रे आजारीच असावा.

मी घरी आलो तर बायको म्हणाली आता आलात तसेच बाजारात जा आणि सामानाची पिशवी घेऊन या. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. घरात पाऊल ठेवतोय न ठेवतोय आणि लगेच परत बाहेर? पण चरफडण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसते. आणि आमच्या चरफडण्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो.
‘श्रीराम बाक्रे यांच्या दुकानात ठेवली आहे’ असं म्हणत ती आत गेली.
‘‘काय झालं होतं त्याला? जवळ जवळ तीन महिने दुकान बंद होतं,’’ मी जिज्ञासेने तिला विचारलं. कारण श्रीराम आजारी असावा या मताशी मी ठाम होतो.
‘‘ह्यॅ! आजारी वगैरे काही नाही. नर्मदा परिक्रमा केली त्यांनी,’’ सौभाग्यवती सहज बोलून गेली.
‘‘नर्मदा परिक्रमा?’’ मी चमकून परत विचारलं.
‘‘हो नर्मदा परिक्रमा!’’
सौ. पुढे काहीतरी बोलत होती. पण मी स्कूटर सुरू करून तडक श्रीराम बाक्रेच्या दुकानाच्या दिशेने पिटाळलीसुद्धा.
१९९२-९३ सालची गोष्ट. माझा मित्र चंद्रकांत गावस सहज बोलता बोलता मला म्हणाला, ‘‘गो. नी. दांडेकरांची भ्रमणगाथा वाचलीस?’’
मी म्हटलं, ‘‘नाही!’’
‘‘मुद्दाम वाच,’’ तो म्हणाला.
मी आमच्या कॉलेजच्या ग्रंथालयातून गो.नि.दां.ची ‘भ्रमणगाथा’ घेतली आणि अधाशासारखी दोन दिवसांत वाचून संपवली. वाचल्यावर कृतार्थ झाल्याची भावना मनात दाटावी असे ते पुस्तक. त्या पुस्तकात नर्मदा परिक्रमेबद्दल वाचलं होतं. ऐन तारुण्यातले ते दिवस होते. पद्मनाभ संप्रदायाच्या कार्यात आम्ही मग्न होतो. मनात तीव्रतेने एक विचार येऊन गेला, आपणही नर्मदा परिक्रमा करायची का? जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करायची आणि तीसुद्धा पायी!
नंतरच्या काळात संसाराचे रहाटगाडगे ओढताना इतका गुरफटून गेलो की नर्मदा परिक्रमा पूर्ण विसरूनच गेलो. त्या दिवशी तिच्या तोंडून नर्मदा परिक्रमा ऐकलं मात्र, जुन्या सर्व आठवणी जाग्या झाल्या.

श्रीराम बाक्रे याच्या दुकानासमोर स्कूटर थांबवली. दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि नर्मदा परिक्रमेची चर्चा सुरू झाली… कधी सुरुवात केली? कसले कसले अनुभव? पायीच केली की गाडीने? एकूण किती किलोमीटर? प्रेरणा कुठून मिळाली? एक ना अनेक प्रश्न! श्रीराम मात्र शांतपणे माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होता. आपण काहीतरी मोठं कार्य केलं असा यत्किंचितही मोठेपणाचा भाव त्याच्या चेहर्‍यावर नव्हता. माणसाच्या मनात श्रद्धा, विश्वास वाढीस लागल्यावर बहुतेक करून अहंकाराचेही स्खलन होत असावे.

कुणाच्या श्रद्धेबद्दल बोलू नये. पण आज फॅशनच झाली आहे. मी दररोज देवाची प्रार्थना करतो. अमुक देव चांगला, मी इतका श्रद्धाळू आहे की सकाळी पूजापाठ केल्याशिवाय चहासुद्धा घेत नाही, माझा इतका जप झाला आहे, माझी ध्यानधारणाच चालूच असते… एक ना अनेक! पण या सर्व गोष्टी आपण स्वार्थासाठीच करतोय ना? की शेजार्‍याच्या कल्याणासाठी?
साईबाबा मोठा की बाळूमामा, श्रीस्वामी समर्थ की गजानन महाराज? हे आपण कोण ठरवणारे? त्यांचा ‘मी’पणा गळून पडला आणि त्याची अनुभूती त्यांना झाली म्हणून ते संतपदाला पोहोचलेले. आपण मात्र अज्ञान आणि अहंकाराच्या गर्तेतून बाहेरच पडू इच्छित नाही. श्रीरामाच्या बोलण्या-वागण्यात मला यत्किंचितही अहंपणाची भावना दिसत नव्हती. जाणवतही नव्हती. तीन महिने तीन हजार किलोमीटरचा अतिशय खडतर पायी प्रवास करून आलेला हा माणूस सहज म्हणत होता, ‘‘खडतर वगैरे काही नाही, तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला कशाचीही कमतरता पडत नाही.’’
शेवटी मी खर्‍या आणि मुख्य प्रश्‍नाकडे वळलो.
‘‘घरचं कसं मॅनेज केलं रे?’’ त्यावर मात्र त्याने मोकळेपणाने हसत सांगितलं, ‘‘त्या नर्मदेची परिक्रमा करायचं मनात आलं आणि घरातल्या नर्मदेने साथ दिली जी खूप महत्त्वाची होती. ‘तुम्ही काही काळजी करू नका, मी इकडं बघते’ हे आश्वासक आणि धीराचे बोल खूप महत्त्वाचे होते.’’
मग हळूच मी माझ्या मनातले विचार मांडले. ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ वाचल्यावर मनात आलेले विचार आणि नंतर झालेले विस्मरण विशद केले. त्यावर श्रीराम म्हणाला, ‘‘तू जगन्नाथ कुंटेचं नर्मदा हर हर वाचलंस का?’’
मी म्हटलं, ‘‘नाही.’’
त्याने सरळ पुस्तकच माझ्या हातात ठेवलं आणि म्हणाला, ‘‘प्रतिभा चितळेंचे यू-ट्युबवरील अनुभव आहेत ते ऐक. माझे अनुभव नंतर कधीतरी सांगता येतील.’’
कुठलाही मोठेपणाचा आव श्रीरामच्या चेहर्‍यावर नव्हता, न बोलण्यात!
मी म्हटलं, ‘‘श्रीराम, काहीतरी थंड दे.’’
‘‘लिंबू सरबत करू का?’’
मी म्हटलं, ‘‘हो.’’
नेहमीची तीच लकब…! गाणं गुणगुणत त्याने सरबत बनवलं. बोलता बोलता तो म्हणाला, ‘‘नर्मदेत मला एक बाण सापडला आहे, त्याचे मी शिवलिंग बनवून घेतले आहे. कधीतरी दाखवीन तुला! आणि हो, येत्या रविवारी बिल्वदलने अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवलाय जावडेकर सभागृहात संध्याकाळी चार वाजता. अवश्य ये.’’
‘ठीक आहे’ म्हणत मी तिथून उठलो आणि निघालो.
पुस्तक मिळालं की मी अधाशासारखा वाचतो. त्यामानाने हल्ली वाचन तसं खूप कमी झालंय, पण जे काय वाचतो ते असंच अधाशासारखं. पुस्तक संपल्याशिवाय चैन पडत नाही आणि चांगलं असेल तर तहान-भूक हे विषय गौण ठरतात.
घरी आलो आणि नर्मदेऽऽ हरऽऽ’ हे पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचत असताना एका वेगळ्याच धुंदीत गेल्याचा अनुभव मला होत होता. रात्री साडेबारा-एक वाजेपर्यंत वाचत होतो. अर्धेअधिक पुस्तक वाचून संपवले होते. दुसर्‍या दिवशी साडेचार वाजता उठायचे होते म्हणून नाईलाजास्तव झोपलो. पण रात्रभर मी नर्मदेच्या परिक्रमेमध्ये होतो.

सकाळी कामावर गेलो. दुपारपर्यंत कामाच्या व्यापात मग्न झालो. पावणेदोन वाजता गाडीत बसलो. गाडी सुरू करताना आठवलं, श्रीरामने कुणातरी बाईबद्दल सांगितलं होतं. ‘बाकरवडी’वरून लक्षात ठेवलं होतं- ‘चितळे.’ मी यू-ट्युबवर टाईप केले. ‘नर्मदा परिक्रमा’ पुढे आपोआप स्क्रीनवर आले. ‘प्रतिभा चितळे नर्मदा परिक्रमा.’
मी भाग एक लावला. गाडीच्या स्पीकरला मोबाइल जोडला आणि ऐकू लागलो. तुम्हाला सांगतो ४० किलोमीटरचा एम.इ.एस. कॉलेज ते साखळीपर्यंतचा प्रवास मी पाऊण तासात पूर्ण करतो. पण त्या दिवशी मला दोन तास लागले.

बर्‍याच वेळा गाडी बाजूला थांबवून मी अश्रूंनी डबडबलेले डोळे पुसून परत निघत होतो. प्रतिभा चितळे यांचे ते ओघवत्या वाणीतील अनुभवकथन थेट हृदयाला भिडत होते आणि नयनाद्वारे कसे बाहेर पडत होते ते माझे मलाच समजेनासे झाले.
घरी आलो. एका वेगळ्या तंद्रीतच. पाच-सहा भाग संपले होते. एवढा भावनाविवश झालो होतो की आता ही तंद्री सोडणे उपयोगाचे नव्हते. मी खोलीत स्वतःला कोंडून घेतले. कपडे बदलण्याची तसदी न घेता कानाला हेडफोन लावला आणि प्रतिभा चितळे यांचे अनुभव ऐकू लागलो. ते ऐकत असताना मला असा भास होत होता क्षणभर की मी स्वतः परिक्रमा करतोय आणि म्हणतोय नर्मदऽऽ हर हर हरऽऽ. कुठल्यातरी जंगलातल्या आडवाटेने जात असताना एक छोटेसे गाव लागते आणि घरातून आवाज येतो, ‘‘मैया खाना खाओगे?’’
रात्री नऊ वाजेपर्यंत मी कानाला हेडफोन लावून प्रतिभा चितळे यांच्या आवाजातील अनुभवकथन ऐकत होतो. एकूण १८ भाग पूर्ण ऐकून झाले आणि मी भानावर आलो. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सहा ते सात तास मी एका वेगळ्याच वातावरणात, एका वेगळ्याच धुंदीत राहिलो होतो. या वातावरणातून बाहेरच पडू नये असं वाटत होतं. एक वेगळीच अनुभूती!
पहिल्याप्रथम आठवण झाली ती श्रीराम बाक्रेची. नर्मदेची सहा-सात तासांची परिक्रमा मला त्याच्यामुळे प्राप्त झाली होती.
क्षणभर वाटले काय किंमत आहे माझ्या शिक्षणाला, माझ्या नोकरीला, माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाला, माझ्या दर्जाला, माझ्या स्थानाला! एका नर्मदा परिक्रमेपुढे सर्व गौण! आणि अचानक श्रीराम मला पूर्वीपेक्षा खूप मोठा दिसू लागला. ‘तुका आकाशाएवढा’ या उक्तीची प्रचिती मला येऊन गेली.
त्याच रात्री जागून मी जगन्नाथ कुंटेंचे ‘नर्मदेऽऽ हरऽऽ’ पुस्तक वाचून काढले. या माणसाचे अनुभव तर भन्नाटच! लागोपाठ तीन वेळा परिक्रमा केली… का तर नर्मदामैयाचा आदेश! बायकोला याने सांगितलं, आपण परिक्रमेला जातोय. पाच-सहा महिने तरी लागतील. बायको म्हणाली, ठीक आहे. नवर्‍याला स्कूटरवर बसवलं आणि बसस्थानकावर सोडून परतली.

नवरा परिक्रमेला आणि बायको घरी. काय म्हणायचं याला? टाटा नाही, बाय-बाय नाही, जपून जा नाही, वेळेवर जेवा नाही, आरोग्याची काळजी घ्या नाही. उलट दोघांचा प्रेम विवाह! नाटकं अजिबात नाहीत!
एका वृद्ध दाम्पत्याने तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी तीन हजार किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली! कसला हा विश्वास! असो.
पण मला मात्र एका वेगळ्याच धुंदीत, एका वेगळ्या वातावरणात नेण्याचं काम श्रीराम बाक्रेने केले होते. उत्साहाच्या भरात मी जाहीर करून टाकले, ‘मी नर्मदा परिक्रमा करीन!’
बोलायला काय जातंय हो! आपण गोंडस नाव देऊया- ‘संकल्प.’ जीवनात योग येईल न येईल पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे?
मी दुसर्‍या दिवशी श्रीराम बाक्रेंच्या दुकानात गेलो. पुस्तक त्यांच्या हातात दिलं आणि त्यांचे चरण स्पर्श करून म्हणालो, ‘नर्मदेऽऽ हर हरऽऽ’