बालमनाची दिवाळी

0
65
  • अंजली आमोणकर

नरकचतुर्दशीच्या पहाटेच्या आंघोळी व फराळ पार पडला व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेजारच्या देशपांडे काकूंकडे चोरी झाली. त्यांची एक सोन्याची चेन नाहीशी झाली. रडारड, भांडणं, आरोप, नोकरवर्गावर संशय- सर्वकाही यथासांग पार पडलं, पण चेन काही मिळाली नाही!

लहानपणी दिवाळीतल्या किल्ल्यांना आम्हा मुलांच्या लेखी फार महत्त्व होतं. मोठ्यांच्या डोळ्यांसमोर चक्क मातीत हात घालून बसायला मिळायचे; तेही तासन् तास. वर्षातून एकदाच मिळणारं लायसन्स होतं ते. प्रत्येक घरातील मोठी भावंडं किल्ला करण्याचा मक्ता घ्यायची व आम्हा चिल्लर पार्टीला इतर कामांकरिता (म्हणजे ‘हे आण- ते आण’) पळव-पळव पळवायची. मध्येच हेरगिरी करायला शेजार्‍यांचे किल्ले पाहून यायला लावायची. मग अमक्याने किल्ल्याला बुरूज व तट केलेत, तमक्याने भुयारं-गुहा व खेळतं पाणी केलंय, अमक्याने बुरुजांवर सैनिक उभे केलेत, तमक्याने शिवाजीला सिंहासनावर बसवलंय… वगैरे वगैरे. आम्ही छोटे हेर. सर्व गुप्त बातम्या अगदी बिनबोभाटपणे घरात पुरवायचो. त्यावर मोठ्या मुलांची खलबतं व्हायची व किल्ल्यात सुधारणा व्हायच्या. मध्येच तलाव करून त्यात पाणी व कागदी नावा सोडल्या जायच्या. पायर्‍या व तट केले जाऊन त्यावर खेळण्यातले सैनिक, तोफा वगैरे विराजमान व्हायच्या.

एका वर्षी आमच्या घरी केल्या गेलेल्या दोनचार कुटुंबांच्या एकत्रित किल्ल्याला भुयारं व दारं केली गेली. भुयारात काय ठेवायचं? हा प्रश्‍न पडला. पण काही ठेवलं तरी ते बाहेरून काही दिसणार नव्हतं. त्यामुळे भुयारात काही ठेवण्याचा पॉईंट फेटाळला गेला. खेळण्यातले पशुपक्षी, कुंड्या, झाडं वगैरेंची सजावट होऊन किल्ला दिवसेंदिवस सुशोभित होऊ लागला. लक्ष्मीपूजनाला किल्ला तयार पाहिजे होता. वसुबारस झाली, धनत्रयोदशी झाली, नरकचतुर्दशीच्या पहाटेच्या आंघोळी व फराळ पार पडला व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेजारच्या देशपांडे काकूंकडे चोरी झाली. त्यांची एक सोन्याची चेन नाहीशी झाली. रडारड, भांडणं, आरोप, नोकरवर्गावर संशय- सर्वकाही यथासांग पार पडलं, पण चेन काही मिळाली नाही! डोळ्यांतल्या पाण्याबरोबर काकूंची दिवाळी आटोपली. आणखीन काहीच जागचं हललंसुद्धा नव्हतं. त्यामुळे सर्वांनी- ‘तूच गडबडीत डाव्या हातानं कुठंतरी टाकली असशील’ अशी तंबी दिली. जंग-जंग पछाडूनही काहीच मागमूस लागला नाही.

दिवाळीच्या सुट्‌ट्या संपल्या. शाळा सुरू झाल्या. आता बायकांची शेवटची विशेष ड्युटी सुरू झाली. फटाक्यांचा झालेला कचरा आवरणे, फराळांचे रिकामे झालेले डबे घासून जागेवर टाकणे, मुख्य म्हणजे किल्ल्याचा रहाडा आवरणे. ज्यांच्या घरी किल्ला बनवला जायचा, त्यांनी तो आवरायचा, असा अलिखित नियमच होता मुळी. किल्ला आवरताना आईच्या हातात काकूंची हरवलेली चेन आली. आई बघतच राहिली. ती तशीच धावत देशपांड्यांकडे गेली. त्यांच्या धाकट्याला फैलावर घेतल्यावर त्याने कबूल करून टाकलं की, ‘‘भुयारात ठेवायला गुप्तधन नव्हतं. धनत्रयोदशीच्या दिवशी आईनं पूजेला सगळे दागिने तबकात मांडले होते म्हणून मी मावळ्याने मनातल्या शिवाजीराजांना विचारून सूरतची बाजारपेठ (चेन) लुटली व ऐवज महाराजांच्या भुयारात नेऊन ठेवला.’’
आई म्हणाली, ‘‘चल, आता तुला महाराजांनी तोफेच्या तोंडी द्यायला सांगितले आहे!’’ तो जो रडत-रडत पळाला तो आमच्या घरी येऊन बसला. हतबुद्ध झालेल्या देशपांडे काकू मात्र ‘हरहर महादेव’ म्हणायचं विसरल्या.

वर्षानुवर्षे गेली. आता नातवंडं दिवाळ्या करताहेत. नरकासुर, किल्ले, फटाके, फराळ, उटणी यांत आता ‘पोल्युशन-हायजीन’ प्रकारांनी धुमाकूळ घातला आहे. रेडिमेड फराळ आता सर्वत्र वर्षभरही उपलब्ध असल्याने दिवाळीच्या पहाटेच्या त्या फराळाला जी चव यायची, ती गंमत गेली. अभ्यंगस्नानाचा अर्थ पोरांना आता डिक्शनरीत शोधावा लागतोय. पण असे ते किल्ले… अशा त्या दिवाळ्या… मागे घडूनही अबाधित उरलीय एकच गोष्ट- किल्ल्यावरील मावळ्यांची ‘स्वामीनिष्ठा…’
नंतर आमच्याकडे एक गमतीदार प्रघातच पडून गेला. मूल ऐकत नसलं की ‘शिवाजी महाराजांनी निरोप पाठवलाय…’ असं म्हणायचं की काम फत्ते!! अजूनही घरात ‘हर हर महादेव’ म्हटलं की पोरांच्या अंगात शिवाजी संचारतो.