उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोव्यात

0
64

>> आज ममता बॅनर्जींचे होणार आगमन

>> शनिवारी कॉंग्रेसचे राहुल गांधी दाखल होणार

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे काल बुधवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी गोव्यात नौदलाच्या हंस तळावर आगमन झाले. त्यांचे ३० ऑक्टोबरपर्यंत चार दिवस गोव्यात वास्तव्य असेल. उपराष्ट्रपतींचे विमानतळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांच्या हस्ते शाल घालून स्वागत करण्यात आले. यावेळी नौदल हंस तळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव परीमल राय व इतर मान्यवर उपस्थित होते. उराष्ट्रपती नायडू हे चार दिवस गोव्यात असतील. त्यांची भेट राजकीय असून ते मंत्री आमदार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

आपल्या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.

उपराष्ट्रपती येणार असल्याने काल दाबोळी विमानतळ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपराष्ट्रपती रस्तामार्गे पणजीला रवाना झाले. यावेळी नाक्यानाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त होता.

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे अनेक दिग्गज नेते तसेच सरकारी पातळीवरील महनीय व्यक्ती या आठवड्यात गोव्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना बराच वेग येणार आहे.

सरकारविरोधातील आरोपपत्राचे प्रकाशन
तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय, महुआ मोइत्रा आणि माजी मंत्री बाबुल सुप्रियो यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी भाजप सरकारविरोधातील आरोपपत्राचे नुकतेच प्रकाशन केले. हा कार्यक्रम आझाद मैदानावर झाला होता.

ममता बॅनर्जी आज येणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी आज गुरूवार दि. २८ रोजी गोव्यात दाखल होणार आहेत. तीन दिवस त्या गोव्यात असतील. या तीन दिवसांत अन्य पक्षातील काही आमदार तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ३० ऑक्टोबरपर्यंत बर्‍याच राजकीय उलथापालथी होणार आहेत. ममता यापूर्वी कधीच गोव्यात आलेल्या नाहीत. त्या प्रथमच येणार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या दौर्‍यादरम्यान जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यताही आहे.

तृणमूल कॉंग्रेस गोव्यात आल्यापासून राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. तृणमूलने कॉंग्रेसला फोडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. कॉंग्रेसमधून गेलेल्या लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेसमधील आपल्या समर्थकांना तृणमूलमध्ये घेण्यावर जोर दिलेला आहे. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसला पुन्हा खिंडार पडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील महिन्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार दि. ३० ऑक्टबर रोजी गोव्यात येणार आहेत. ते प्रदेश कॉंग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बैठक घेणार आहेत.

सक्रिय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येत्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठीच हा दौरा असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याशिवाय कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे सध्या गोव्यात आले आहेत.