>> गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा आरोप
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर केलेले आरोप हे एक मोठे षडयंत्र असून त्यांची मुलाखत घेणारे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीच हे षडयंत्र कुणाच्या तरी सांगण्यावरून रचल्याचा आरोप काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.
पत्रकार राजदीप सरदेसाई हे स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपद्वेष्टे आहेत. त्यांना संघ व भाजपची ऍलर्जी असल्याचे सांगून तानावडे यांनी, आपल्या मनात संघ व भाजपाविषयी जेे जे काही आहे ते त्यांनी मुलाखतीच्या वेळ सत्यपाल मलीक यांच्याकडून वदवून घेतल्याचा आरोप तानावडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
आज सत्यपाल मलिक यांनी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नसल्याचे सांगून आपण जे काही बोललो त्याचा फायदा घेऊन कुणीही मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करणे हे चूक असल्याचे सांगितले हे बरे झाल्याचे स्पष्ट केले. मलिक हे गोव्याचे राज्यपाल असताना त्यांनी गोवा सरकारच्या कोविड व्यवस्थापनाविषयी चांगले मत मांडले होते, याची आठवण तानावडे यांनी यावेळी करून दिली.
राजभवनची इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत बांधण्याची कोणतीही योजना सरकारने आखली नव्हती. मलिक हे राज्यपाल असताना त्यांना राजभवन इमारतीच्या पायर्या चढता येत नव्हत्या. त्यामुळे ते तळमजल्यावरच राहत असत. आपणाला वर जाता यावे यासाठी लिफ्टची सोय करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली होती. पण राजभवनची इमारत ही जुनी असल्याने ते करत येणे शक्य नव्हते. त्यामुळे राज्य सरकार राजभवन परिसरात दुसर्या ठिकाणी एक नवी इमारत बांधू पाहत होते, असा खुलासाही तानावडे यांनी केला. राजभवनची जुनी ऐतिहासिक इमारत पाडण्याचा विचारही कधी सरकारने केला नसल्याचे ते म्हणाले. कोविड काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने खुली होती. त्यामुळे ती पुरवण्यासाठी कुणाला तरी कंत्राट देण्यात आले होते असे मलिक यांनी जे म्हटले होते त्यातही तथ्य नसल्याचा खुलासा तानावडे यांनी केला. गोव्यातील जनता ही सूज्ञ असून त्यांना सगळे काही कळते. त्यामुळे गोव्यातील लोक राजदीप सरदेसाई यांनी रचलेल्या षडयंत्राला बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मंत्री मिलिंद नाईक व दामू नाईक हे हजर होते.
आरोपांबाबत बोलण्यास राजेेंद्र आर्लेकरांचा नकार
मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर जे आरोप केले आहेत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास काल गोव्याचे माजी सभापती व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नकार दिला.
राजेंद्र आर्लेकर यांचे दोन दिवसांच्या गोवा दौर्यावर आगमन झाले होते. बुधवारी ते हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी निघाले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मलिक यांनी गोवा सरकारवर जे आरोप केले आहेत. त्याची माहिती आपणाला वर्तमानपत्रांतून मिळाली. मात्र, आपणाला त्याविषयी काहीही बोलायचे नाही. मलिक हे स्वत: राज्यपाल आहेत व मीही राज्यपाल आहे. मी राज्यपालपदी असल्याने त्याविषयी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोवा भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची प्रतिक्रिया आपण वर्तमानपत्रांतून वाचली आहे. ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष असल्याने या विषयावर प्रतिक्रिया देऊ शकतात असे आर्लेकर म्हणाले.