गोवा सरकारमध्ये सगळाच भ्रष्टाचार ः सत्यपाल मलिक

0
52

>> ‘इंडिया टुडे’ ला दिलेल्या मुलाखतीत घणाघाती आरोप; तक्रारीनंतर भ्रष्टाचार्‍यांऐवजी आपल्यालाच राज्यपाल पदावरून हटवले

गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे भ्रष्टाचारी असून, कोरोना काळातील त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रयत्नांस आपण विरोध केल्यानेच आपल्याला राज्यपालपदावरून हटविण्यात आले, असा खळबळजनक गौप्यस्फोट गोव्याचे माजी राज्यपाल व मेघालयचे विद्यमान राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक यांनी काल केला. इंडिया टुडे वृत्तवाहिनीसाठी ज्येष्ठ पत्रकार श्री. राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये श्री. मलिक यांनी अनेक विषयांवर परखड मते व्यक्त केली.

गोव्यात कोरोना पसरत असताना राज्य सरकारने परिस्थिती नीट हाताळली नाही. राज्य सरकारच्या सगळ्याच बाबतींत भ्रष्टाचार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आपण ते लक्षात आणून दिले, परंतु मोदींनी भ्रष्टाचारात गुंतलेल्यांनाच त्यासंबंधी विचारले. त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध कारवाई होण्याऐवजी आपल्यालाच राज्यपालपदावरून हटविण्यात आले, अशी स्पष्टोक्ती श्री. मलिक यांनी केली आहे. मात्र, गोमंतकीय जनतेने आपल्याला भरभरून पाठिंबा दिला. आपल्यावर कोकणीतून गीतेही रचली गेली, असे श्री. मलिक यांनी अभिमानपूर्वक नमूद केले.

आपण लोहियावादी आहोत. कोठेही भ्रष्टाचार होत असेल तर आपण तो सहन करू शकत नाही. म्हणूनच गोव्यात कोरोना काळात राज्य सरकार भ्रष्टाचारी असल्याचे दिसताच आपण पंतप्रधानांचे त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केले, तेव्हा जीवनावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. घरोघरी जीवनावश्यक वस्तू पुरवू असे सरकारने सांगितले. एका खासगी कंपनीला त्यासाठी पैसे दिले जाणार होते. त्यात भ्रष्टाचार असल्याचे दिसून येताच मी पंतप्रधानांना कळवले; पण त्यांनी त्या भ्रष्टाचारात गुंतलेल्यांनाच त्यासंबंधी विचारले. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई झाली तर नाहीच, उलट आपल्यालाच राज्यपालपदावरून हटविण्यात आले, असे श्री. मलिक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव न घेता सांगितले. मात्र, पंतप्रधान मोदींबद्दल आपण अजूनही आशावादी आहोत. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ म्हणत ते सत्तेवर आलेले असल्याने ते ह्यासंदर्भात कारवाई नक्कीच करतील, असा विश्‍वास आपल्याला असल्याचे मलिक यांनी सांगितले.

कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन असताना एका खाणीवरील ट्रक गोव्यात येत होते. त्यामुळे राज्यात कोरोना पसरेल, अशी भीती आपण व्यक्त केली होती; परंतु सरकारने आपले ऐकले नाही. परिणामी त्यामुळे त्या भागात कोरोना पसरला, असेही श्री. मलिक यांनी कोरोना काळात परराज्यातून गोव्यात सुरू असलेल्या खाण वाहतुकीचा निर्देश करीत सांगितले.

मी गोव्यात सरकारशी भांडण केले नाही. मी मुख्यमंत्र्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांना गोव्याचे राजभवन नव्याने बांधायचे होते. मी त्यांना सांगितले की, मी त्या राजभवनातील केवळ दीड खोलीत वास्तव्य करून आहे. गोव्याचे राजभवन ही वारसा वास्तू आहे. तिची दुरुस्ती करता येईल, नव्याने संपूर्ण राजभवन बांधण्याची काही आवश्यकता नाही; परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी नव्या बांधकामाचाच घाट घातला होता, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारात स्वतः गुंतलेल्यांनीच पंतप्रधानांची दिशाभूल केली, असा आरोपही मलिक यांनी केला.

देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसेल, असे भाकीतही ह्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी वर्तवले. पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनामुळे भाजपचे नेते गावांत जाऊही शकत नाहीत, अशी आज परिस्थिती आहे. शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले आहे. हे असेच चालत राहिले तर येणार्‍या निवडणुकांत भाजपला फार मोठे नुकसान सोसावे लागेल, असा इशाराही मलिक यांनी दिला. शेतकरी आंदोलनाची उपेक्षा कराल, तर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा सर्व राज्यांत भाजपचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही, असे मलिक यांनी सांगितले. आपण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनाही हे स्पष्टपणे सांगितले; परंतु त्यांनी अद्याप ते ऐकलेले नाही. त्यांची कोणीतरी दिशाभूल करत असावे, असेही मलिक उत्तरले. आपण मोदी सरकारला आव्हान देत नसून केवळ सल्ला देत आहोत असे सांगून श्री. मलिक म्हणाले की, त्यामुळे उद्या आपल्याला राज्यपालपदावरून हटवले जाणार असेल तरी आपल्याला त्याची पर्वा नाही. खुर्ची सोडण्यास आपण तयार आहोत; परंतु आपण जे बोलतो आहोत ते शत प्रतिशत खरे आहे.
काश्मीरचा राज्यपाल असताना आपल्याला एका उद्योगपतीची आणि एका संघपरिवाराच्या निकटवर्तीयाची अशा दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी प्रत्येकी दीडशे कोटींची लाच देऊ केली गेली होती, असेही मलिक यांनी सांगितले. आपण पंतप्रधानांच्या कानी ती माहिती दिली व सदर फाईलींवर सही करणे नाकारले, असेही मलिक यांनी सांगितले.

आज लोक खरे बोलायला घाबरत आहेत; पण आपण खरे बोलायला घाबरणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले. ईडी आणि आयकर खात्याची आपल्याला भीती वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजकारणात आज पूर्वीची समाजसेवेची भावना उरलेली नाही. आज काहींसाठी तो व्यवसाय बनला आहे अशी टीका मलिक यांनी यावेळी केली.

काय म्हणाले माजी राज्यपाल?
कोरोना महामारीच्या हाताळणीत सरकारी गैरकारभार.
राज्य सरकारच्या सगळ्याच गोष्टींत भ्रष्टाचार.
लॉकडाऊन काळात खासगी कंपनीला कंत्राटाचा प्रयत्न.
लॉकडाऊन असतानाही खाण वाहतुकीस परवानगी.
राज्य आर्थिक संकटात असताना नव्या राजभवनचा घाट.
पंतप्रधानांनी तक्रारीची शहानिशा भ्रष्ट लोकांकडेच केली.
मुख्यमंत्र्यांऐवजी आपल्यालाच हटवले गेले.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे मौन
पणजीतील भाजपच्या कार्यालयात काल पार पडलेल्या एका बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी पूर्णपणे मौन बाळगले. मुख्यमंत्र्यांनी अन्य विषयांवर भाष्य केले; परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चुप्पी साधली.

मलिक यांचे आरोप खोटे व निराधार : तानावडे
सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्याबाबत आम्ही त्यांच्याविरुद्ध केंद्र सरकारकडे तक्रार करणार आहोत. त्यांनी केलेले आरोप हे खोटे आणि निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

गोवा फॉरवर्ड, तृणमूल कॉंग्रेसकडून
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर जे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत, त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री पदावरून हटवायला हवे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे. तसेच तृणमूल कॉंग्रेसने देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मलिक यांच्याकडून आमच्या
मतालाच दुजोरा : प्रदेश कॉंग्रेस
कोरोना काळात सरकारने लोकांच्या वेदनांचा बाजार मांडला, या आमच्या म्हणण्यालाच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दुजोरा दिला, अशी प्रतिक्रिया प्रदेश कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे.