देवदूत

0
40

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ख्यातनाम ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या अकाली निधनाने काल अवघा गोवा हळहळला. सेवा परमो धर्मः ह्या ब्रिदाने गोमंतकीयांची अविरत आणि अहोरात्र सेवा करीत आलेल्या त्यांच्यासारख्या उमद्या, सेवाभावी डॉक्टरला आपल्यातून अकाली घेऊन जाणारा काळ किती क्रूर असेल! काळ नित्यनेमाने असे घाले घालत असतो. आपल्यातून दिवसागणिक माणसे हिरावून घेत असतो. परंतु अशीही काही माणसे आपल्यातून हिरावून घेतली जातात, जी केवळ माणसे नसतात, माणसांमधली मौलिक मोती – माणके असतात. डॉ. देसाई हे अशांपैकी एक होते, म्हणूनच तर त्यांच्या निधनाने सर्व थरांतील आणि सर्व क्षेत्रांतील गोमंतकीयांचे डोळे पाणावले आहेत.
तसे पाहता उच्चविद्याविभूषित डॉक्टरांची आपल्याकडे वानवा नाही. दरवर्षी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्याबाहेरील वैद्यकीय इस्पितळांतून शेकडोंच्या संख्येने नवे डॉक्टर बाहेर पडत असतात, सेवा बजावत असतात. परंतु एखाद्या डॉक्टरच्या जाण्याने समाजाच्या सर्व क्षेत्रांतून अशा प्रकारची खरीखुरी हळहळ व्यक्त होण्याचे प्रसंग विरळाच असतात, याचे कारण आज वैद्यकीय क्षेत्र हे पूर्वीप्रमाणे निःस्वार्थ, सेवाभावी क्षेत्र उरलेले नाही अशीच जनभावना बनलेली आहे. परंतु तरीही अशी काही मंडळी ह्या क्षेत्रात आजही आहेत जी अखंड निःस्पृह, निरपेक्ष मानवसेवेची ध्वजा आपल्या खांदी निमूटपणे वाहत आली आहेत. वैद्यकीय पेशाप्रतीची आस्था, आदर आणि आपुलकी त्यांच्यामुळेच तर टिकून आहे. समाजाच्या सर्व थरांमध्ये अशा सेवाभावी डॉक्टरांप्रती प्रचंड प्रेम, आदर आणि सन्मान दिसतो. गतकाळातील एका उज्ज्वल परंपरेचा वारसा ही मंडळी निष्ठेने पेलत आलेली असतात. डॉ. मंजुनाथ देसाई हे अशांपैकी एक मुकुटमणी होते. त्यांचा साधेपणा, त्यांचे सौजन्य, त्यांच्या बोलण्यातील मार्दव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील सकारात्मक वृत्ती ही आपल्या ह्रदयविकारांनिशी त्यांच्याकडे धावून येणार्‍या रुग्णांना जणू अर्धेअधिक बरे करीत असे.
डॉ. देसाई शिरशिरे – बोरीचे. ह्याच परिसरात शिरोड्यामध्ये डॉ. सखाराम गुड्यांनी एकेकाळी गरीबांचा डॉक्टर म्हणून आपला नावलौकीक प्रस्थापित केला होता. डॉ. मंजुनाथ देसाई त्याच उदात्त सेवाभावी परंपरेचे एक पाईक होते. त्यांना कर्करोगासारखा आतून पोखरून टाकणारा गंभीर आजार होता हे अनेकांना तर काल त्यांच्या निधनाच्या बातमीतूनच कळले. स्वतःच्या व्याधीची तमा न बाळगता, तिचा तीळमात्र बाऊ न करता, हजारो गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी डॉ. देसाई जी अहोरात्र धडपड करायचे तिला खरोखरीच तोड नाही. क्षणाचीही उसंत न घेता ते गोमेकॉच्या ह्रदयरोग विभागामध्ये कसे अखंड वावरायचे, कितीही ताणतणाव असला तरीही आपल्या स्वरामध्ये तो येऊ न देता समोरच्या प्रत्येकासाठी कसा वेळ द्यायचे, कसे आश्वस्त करायचे हे आठवले की डोळ्यांच्या कडा पाणावल्यावाचून राहात नाहीत.
गोव्यासारख्या राज्यामध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण फार मोठे आहे. ह्रदयविकाराच्या रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्रदयरोगाशी संबंधित सुपरस्पेशालिटी विभाग सुरू होण्याआधी अशा रुग्णांना एक तर खासगी इस्पितळांकडे किंवा मुंबईतील बड्या इस्पितळांकडे धाव घ्यावी लागत असे. परंतु गोमेकॉमध्ये हा सुपरस्पेशालिटी विभाग सुरू झाला आणि तेथील सेवाभावी डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या अहोरात्र सेवेच्या बळावर अल्पावधीतच खासगी इस्पितळांकडे जाणारा रुग्णांचा सारा ओघ गोमेकॉकडे वळला. त्यामागे जो विश्वास होता तो निर्माण करण्यात डॉ. मंजुनाथ देसाई यांचे फार मोठे योगदान होते. एखाद्या सरकारी इस्पितळामध्ये देखील रुग्णांना इतकी उत्तम सेवा कोणत्याही वशिल्याविना मिळू शकते हा अनुभवच मुळी सर्वसामान्य रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अनोखा होता. डॉ. देसाई यांच्या बाह्यरुग्ण विभागाबाहेर लागणार्‍या रुग्णांच्या रांगाच त्याची साक्ष देत असत. आपल्याकडे येणार्‍या प्रत्येक रुग्णाची आस्थेने चौकशी करून, त्यांच्या गरजेनुरुप त्यांच्यावर वेळीच उपचार होण्याची शिकस्त डॉ. देसाई करीत असत. डॉ. देसाईंनी जबाबदारी स्वीकारली म्हणजे आपले माणूस निश्‍चितच बरे होईल हा विश्वास त्यांनी निर्माण केलेला होता. त्यांच्या जाण्याने गोव्याचे आणि गोमंतकीयांचे केवढे मोठे नुकसान केलेले आहे त्याची गोमेकॉच्या ह्रदयरोग विभागातून उपचार घेतलेल्या प्रत्येक रुग्णाला आणि त्यांच्या नातलगांना निश्‍चितपणे जाणीव असेल. गोमेकॉच्या ह्या विभागाला डॉ. देसाईंचे नाव देऊन त्यांच्या सेवाभावी वृत्तीची स्मृती सरकारने चिरंतन करावी. तीच ह्या देवदूताला खरी श्रद्धांजली ठरेल.