उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागात लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार, नैनिताल जिल्ह्यात जास्तीत जास्त २८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही ११ जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे येथे मृतांचा आकडा वाढू शकतो. याशिवाय १२ लोक जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हवाई दलाची मदत पथक मदत कार्यासाठी हल्द्वानीला रवाना झाले आहे. दरम्यान, रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग १०७ बंद आहे. डोंगरावरून दरड येत असल्याने नौलापाणीजवळ रस्ता बंद आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे चारधाम यात्रेवरही परिणाम झालेला आहे. तसेच याचा राज्यातील एकंदरीत पर्यटनावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. नैनीतालमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे पर्यटक येथे अडकलेले आहेत. ऋषिकेशमध्ये पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. उधम सिंह नगरमधील पूरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मुख्यमत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये आणि ज्यांची घरे तुटलेली आहेत त्यांना १ लाख ९ हजार रुपये दिले जातील. ज्यांना जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत केली जाईल असे सांगितले.
मुख्यमंत्री धामी यांनी पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करून पुराचा आढावा घेतला.