>> दोन स्थानिकांना अटक
सरमळे पेडणे येथे मुंबई येथील अबकारी विभागाच्या दोन अधिकार्यांना त्यांची ओळख न पटल्याने स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी संशयित विकी साळगावकर व श्रीकृष्ण कुडव ह्या सरमळे पेडणे येथील स्थानिक युवकांना पेडणे पोलिसांनी अटक केली.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा मुंबई येथील अबकारी विभागाचे दोन उपनिरीक्षक, एक चालक व इतर एक असे चारजण सरमळे येथे स्वीफ्ट कारने आले. या अधिकार्यांनी स्थानिक पोलीस स्थानक किंवा पेडणे अबकारी कार्यालयाला काहीच कल्पना दिली नव्हती. ते सरमळे येथील एका बारमालकाच्या घराशेजारी घिरट्या घालू लागले. यावेळी तेथे असलेल्या युवकांनी या अबकारी अधिकार्यांच्या गाडीचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर स्वीफ्टचा क्रमांक चुकीचा असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे तेथील स्थानिक युवकांनी या गाडीतील चालकाकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी स्थानिक युवक व ते अधिकारी यांच्यात वादावादी झाली. स्थानिकांनी अधिकार्यांकडे ओळखपत्रे मागितली असता ती त्यांच्याकडे नसल्याचे दिसून आले. यानंतर वादावादीचे मारामारीत रुपांतर झाले. यात अबकारी विभागाचे प्रवीण कांबळी व रवींद्र राणे हे दोघे उपनिरीक्षक जखमी झाले.
या दरम्यान स्थानिकानी एमएच ०७ एव्ही ७८९९ या कारचीही तोडफोड केली. या गाडीत दगड आणि लोखंडी सळ्या सापडल्या. तसेच गाडीच्या क्रमांकात फेरफार केल्याचे दिसून आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.