>> कर्नाटकच्या पाच संशयितांना अटक
प्राईसवाडा- हणजूण येथील सागर श्रीपाद नाईक (४५) यांच्यावर हणजुण येथील कार पार्किंगमध्ये कर्नाटकी तरुणांच्या टोळक्याकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. नंतर उपचारासाठी जवळच्या खासगी इस्पितळात नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच हणजूणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस यांनी तात्काळ कारवाई करत पाळोळे येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींना ताब्यात घेतले. हणजूण पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह बांबोळीच्या शवागारात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सुमोतून (केए ०१ पी ७३२६) हणजुणात पोहोचलेल्या पाच जणांच्या कर्नाटकी टोळक्याने तेथील पार्किंगदरावरून सागरशी बाचाबाची झाली. त्यावेळी त्यातील एकाने सागर नाईक यांच्या डोक्यावर लाकडी दंडुक्याने जोरदार प्रहार केला. त्यामुळे सागर हे जखमी झाले. त्यांना इस्पितळात नेताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.
दरम्यान, या हल्ल्यातील पाचही संशयितांना हणजूण पोलिसांनी काणकोण पोलिसांच्या मदतीने गोव्याची पाळोळे येथील सीमा ओलांडताना शिताफीने ताब्यात घेतले. सध्या सर्व आरोपींची काणकोणच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.