‘दमा’वर होमिओपॅथीच हितकर

0
95
  • डॉ. आरती दिनकर
    होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक
    पणजी

वारंवार होणारी सर्दी, शौचास साफ नसणे, अपचन, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार, मन:क्षोभ, हवेतील फेरफार, धुरळा, धूर, काही प्रकारचे वास वगैरे क्षोभक कारणांनी या रोगास सुरुवात होते.

एकदा एक रुग्ण आला तो खोकत खोकतच. वाकलेला.. काहीसा क्षीण झालेला. त्याचा चेहरासुद्धा काहीसा काळसर- निळसर वाटला, मी त्याला तपासले तेव्हा त्याची नाडी अनियमित व जलद लागत होती. छातीमध्ये सूं सूं आवाज येत होता. घशातसुद्धा घरघर.. सूंसू..ं असा आवाज येत होता. कानशिलास खूप घाम आला होता. हात, पाय, नाक व कान थंड वाटत होते व त्याच्या हालचालीवरून तो खूप अस्वस्थ वाटत होता. मी त्याची विचारपूस केली तेव्हा समजले की, त्याचे वडील दम्याचे रुग्ण होते. म्हणजे रुग्णामध्ये रोगाचे बीज वडिलांकडून आले होते. बरेचदा दमा किंवा अस्थमा हा रोग अनुवंशिक असू शकतो. अपवाद फक्त ऍलर्जीमुळे होणारा दमा; उन्हाळ्यामध्ये होणारा दमा व सर्दीवगैरेसारख्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारा दमा. बरेचदा रुग्णाला जो त्रास होतो त्यामुळे घरातील लोकसुद्धा वैतागतात आणि ते त्या रुग्णाशी तिरस्काराने वागतात किंवा त्या रोगाच्या होणार्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. शिवाय तो रुग्णही स्वतः दम्याची लक्षणे सहन करीत असतो. जेव्हा रुग्णाला याची जाणीव होते की आपल्याला घरातील लोक कंटाळले आहेत.. आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत.. तेव्हा रोग्याला मानसिक त्रास, मन:क्षोभ झाल्यामुळे दमा वाढीस लागण्याच्या व दमा होण्याच्या घटना घडतात. ह्या रुग्णाने होमिओपॅथीचे औषध जवळजवळ दोन वर्षे घेतले आणि त्याचा दमा कायमचा बरा झाला. तो जो पफ किंवा स्प्रे तोंडामध्ये वापरत होता तो हळूहळू कमी केला.

दमा हा रोग अगदी तीन आठवड्यांच्या मुलांपासून ते मोठ्या दहा-बारा वर्षांच्या मुलांपर्यंत तसेच मोठ्या व्यक्तींना होऊ शकतो. तर काहींना अचानक म्हातारपणी दमा झालेला दिसून येतो. काहीजणांना समुद्रकाठच्या हवेमध्ये बरे वाटते तर काहींना याच्या उलट होते. काहींना शहरात तर काहींना खेड्यातील मोकळ्या हवेत बरे वाटते. काहीजणांना दमा बंदिस्त व गर्दीच्या जागेतच होतो तर काहींना दलदलीच्या धुकट व थंड हवेत तर काहीना उन्हाळ्यात. काहींना दिवसा तर काहींना रात्री याचा त्रास होतो. काही रोग्यांमध्ये अमुक एक अन्न खाल्ले अगर एखाद्या विशिष्ट पदार्थाचा वास घेतला किंवा त्याचा स्पर्श झाला तर दमा होतो.

निरोगी स्थितीत श्वास घेण्याची क्रिया श्वास बाहेर सोडण्याच्या क्रियेपेक्षा जास्त वेळ राहते. दम्याच्या रुग्णांत याच्या उलट स्थिती होते- श्वास आत घेण्याची क्रिया थोडा वेळ राहून श्वास बाहेर सोडण्याची क्रिया फार जास्त वेळ राहते व त्यामुळेच रोग्यास फार कष्ट होतात. या रोगाचे बीज वाड-वडिलांपासून येते. असे रोगबीज ज्याच्यामध्ये आहे, तो जसा जसा म्हातारा होतो तसा तसा हा रोग त्याला जास्त त्रास देतो. सर्दीखोकला, मुळव्याधी किंवा खरूज यामुळे हा रोग होऊ शकतो. वारंवार होणारी सर्दी, शौचास साफ नसणे, अपचन, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार, मन:क्षोभ, हवेतील फेरफार, धुरळा, धूर, काही प्रकारचे वास वगैरे क्षोभक कारणांनी या रोगास सुरुवात होते.

सर्वसाधारणपणे पूर्व लक्षणे नसतानासुद्धा एकदम याची सुरुवात होते. कधी-कधी एकसारख्या पुष्कळ दिवस शिंका येत असणे हे लवकरच दमा होणार्‍याचे पूर्वचिन्ह म्हणून दृष्टीक्षेपात येते. परंतु हे लक्षण बहुदा उन्हाळ्यात होणार्‍या दम्यामध्ये आढळते. दमा सुरू झाल्यानंतर चेहरा फिकट अगर काळसर- निळसर पडतो व रोगी अस्वस्थ होतो. वर सांगितलेली दम्याची लक्षणे तर असतातच, याशिवाय दम्याचा अटॅक आला तर तो रोगी चांगले बोलू शकत नाही, मोठ्या कष्टाने एखादा शब्द उच्चारतो पण रोग्यास हा त्रास सतत झाल्यास चेहरा फुगीर होतो, ओठसुद्धा काळे-निळे होतात. बरेचदा रोग्यास खोकल्यावाटे कफ पडल्यानंतर बरे वाटते.
दमा हा रोग योग्य होमिओपॅथिक औषधांनी बरा होऊ शकतो. दमा हा असाध्य नाही फक्त कायमचे बरे होण्यासाठी योग्य होमिओपॅथिक औषधांची गरज आहे. बरोबरीने योग्य पथ्य पाळणे; आहार-विहारही महत्त्वाचे आहे. एकदा दमा झाल्यानंतर तो कायमच राहतो हा समज चुकीचा आहे. होमिओपॅथीमध्ये ज्या कारणांमुळे ही लक्षणे उद्भवली असतील ती कारणे व तो रोग लक्षात घेऊन त्यावर उपचार करावे लागतात.