एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे

0
56

>> कंपनीवरील कर्ज फेडण्याची टाटाची तयारी

तोट्यात असलेल्या ‘एअर इंडिया’ची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे आली आहे. सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुंतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी दिली.

सरकारला या व्यवहारामधून १२ हजार ९०३ कोटींची अपेक्षा असताना टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत. सरकार आणि टाटांमधील या करारासंदर्भातील महत्वाची माहिती पांडे यांनी दिली. टाटांनी १८ हजार कोटींची बोली लावली होती. ज्यामध्ये १५ हजार ३०० कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे. हे कर्ज वगळता बाकी रक्कम टाटा कंपनी रोख देणार आहे. टाटा सन्सला एअर इंडिया या ब्रॅण्डमध्ये तसेच लोगोमध्ये पुढील पाच वर्षे कोणतेही बदल करता येणार नाही. तसेच पाच वर्षांनंतर काही हस्तांतरण करायचे झाल्यास ते भारतीय व्यक्तीच्याच नावे करावे लागणार असल्याची अट घालण्यात आली आहे. तसेच टाटांना पुढील एका वर्षासाठी एअर इंडियाच्या सर्व कर्मचार्‍यांना कामावरून कमी करता येणार नाही. तर दुसर्‍या वर्षापासून ते कर्मचार्‍यांना व्हीआरएसच्या माध्यमातून कंपनीमधून कमी करु शकतात, अशीही अट घालण्यात आली आहे. सरकारला दोन हजार ७०० कोटी रुपये टाटांकडून रोख दिले जाणार आहेत. या मोबदल्यात सरकार आपला कंपनीतील १०० टक्के वाटा टाटांच्या नावे करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रीगटाने या बोलीला मंजुरी दिली असून एकूण दोन कंपन्यांनी बोली लावल्या होत्या. मात्र सर्वश्रेष्ठ बोली लावणार्‍या टाटांकडे एअर इंडियाचा कारभार सोपवण्यात येणार आहे.