>> आयसीएमआरने वर्तवली शक्यता; पर्यटन, कार्यक्रमांमुळे तिसरी लाट शक्य
कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा खाली घसरत जाणे ही देशासाठी सर्वात आनंददायक बातमी आहे. मंगळवाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १८,३४६ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, संक्रमण दर घटत असल्याने नागरिक गाफिल राहिले, तर देशाच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. परिणामी पुन्हा देशात लॉकडाऊन लावावा लागेल, अशी शक्यता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) व्यक्त केली आहे.
आयसीएमआर आणि लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’मुळे भारताला कोरोना संक्रमणाच्या तिसर्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. या अभ्यासानुसार, येत्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान कोरोना संक्रमणाच्या आकड्यांत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ शकते.
गेल्या दीड वर्षांपासून घराबाहेर पडणे शक्यतो टाळणार्या व्यक्ती येत्या काही महिन्यांत फिरण्याची संधी साधू शकतात. त्यामुळेच विमान तिकिट आणि हॉटेलचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांशिवाय स्थानिक रहिवासी आणि प्रशासनाला आपली जबाबदारी वेळीच ओळखावी लागेल, असा सल्ला आयसीएमआरकडून देण्यात आला आहे.
‘जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, देशांतर्गत पर्यटनाचा कोरोना संक्रमणावर परिणाम अभ्यासण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पर्यटनांसाठी प्रसिद्ध असणार्या हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांत करोना संक्रमण फैलावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांना पर्यटनासाठी देण्यात आलेली सूट तिसरी लाट उद्भवण्यासाठी पुरेशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक आयोजनांमुळे ही तिसरी लाट आणखी घातक होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
देशात १८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंंद
देशातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ३४६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या २०९ दिवसांमधील हा सर्वात कमी आकडा ठरला असून, सक्रिय रुग्णांची संख्याही मार्च २०२० नंतर सर्वात कमी आहे. सद्यस्थितीत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा २ लाख ५२ हजार ९०२ वर पोहोचला आहे. सध्या देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ९७.९३ टक्के इतका झाला आहे.